ही आहे दुनियेतील महागडी कॉफी


कॅफे, रेस्टॉरंटमध्ये जाऊन आपण दिवसाच्या कोणत्याही वेळी, कोणत्याही ऋतूमध्ये कॉफी पिण्याचा आनंद लुटत असतो. प्रत्येक गावात मस्त कॉफी मिळणारी काही खास कॅफे किंवा रेस्टॉरंट असतात. कुणाला मद्रासी कॉफी भुरळ घालते तर कुणाला फिल्टर कॉफी. कुणी इन्स्टंट कॉफीचा भोक्ता असतो तर कुणी वेलदोडे, जायफळ घालून केल्या जाणाऱ्या खास कॉफीचा चाहता असतो. आता इटालियन कापुचिनो सारख्या विविध स्वादाच्या कॉफी कॉफी प्रेमीना भुरळ घालत आहेत. पण एकुणात अगदी महागात महाग कॉफीची किंमत २०० रुपयांपेक्षा अधिक पुढे जात नाही. पण जगातील सर्वात महाग कॉफी प्यायची असेल तर मात्र एका कप साठी तब्बल ७५ डॉलर्स म्हणजे ५२२८ रुपये आणि २५ पैसे मोजावे लागतात आणि ही कॉफी पिण्यासाठी अमेरिकेत जाऊन क्लेच कॉफी कॅफे गाठावा लागतो.


तसे या कॅफेच्या शाखा सान फ्रान्सिस्को आणि सदर्न कॅलिफोर्निया मध्येही आहेत. या महागड्या कॉफीचे अनेकजण दिवाने आहेत. या कॉफीला नॅचरल गिशा ८०३ असे म्हटले जाते. कॅफेचे अधिकारी या नावामागचे रहस्य असे सांगतात की, ही कॉफी लिलावात १ पौड साठी (४५० ग्रॅम ) ८०३ डॉलर्स मध्ये विकली गेली. म्हणजे ५६ हजार रुपये पौंड. तेव्हापासून तिला हे नाव मिळाले.


यापूर्वी या कॉफीच्या फक्त ४५ किलो बिया विकल्या जात आणि त्या बहुतेक जपान, चीन आणि तैवान मध्ये निर्यात केल्या जात. कल्च कॅफे त्याच्या ग्राहकांसाठी फक्त चार किलो बिया वाचवू शकते. मालक सांगतात ही कॉफी उत्तर अमेरिकेत कुठेच मिळत नाही. फक्त आम्ही ती वापरतो. त्यामुळे लिलावात जबरदस्त बोली लावावी लागते आणि ग्राहकाला ७५ डॉलर्स घेऊन एक कप कॉफी विकणे भाग पडते.


या कॉफीचे खरे नाव आहे पनामा. कॉफी कॉम्पिटिशनमध्ये ही कॉफी सर्वश्रेष्ठ मानली जाते. या स्पर्धेला कॉफी जगताचे ऑस्कर म्हटले जाते. पनामा (मध्य अमेरिका) मध्ये मिळणाऱ्या दुर्लभ अरेबिका कॉफीची ही प्रजाती असून तिची चव चहा सारखी असते. जस्मिन आणि बेरी अश्या दोन स्वादात ती मिळते आणि ही कॉफी प्यायल्यावर मेंदूत स्फोट झाल्याचा फील येतो असे सांगतात.

Leave a Comment