फाटक्या जीन्सचा ट्रेंड येथून झाला सुरु


जीन्स दीर्घकाळ फॅशन मध्ये राहणारा कपडा ठरला असून आजकाल तर रोजच्या वापराची वस्तू बनली आहे. महिला, पुरुष, मुले, मुली नित्यनेमाने जीन्स वापरास प्राधान्य देत असून हा जाडाभरडा रफटफ प्रकार आजही जगभर लोकप्रिय आहे. आता तर अनेक रंगात, विविध ढंगात जीन्स छोट्या दुकानांपासून बड्या मॉल पर्यंत सर्वत्र विराजमान झालेल्या दिसतात. आपल्याला कदाचित माहिती नसेल कि २० मे याच दिवशी लेविस कंपनीने जिस साठी पहिले पेटंट घेतले होते.


आजकाल फाटक्या जीन्स वापरणाचा ट्रेंड खूपच बोकाळला असून सेलेब्रिटीपासून सर्वसामान्य लोक अश्या जीन्स मोठ्या अभिमानाने मिरवत आहेत. फाटक्या जीन्सचा ट्रेंड न्यूयॉर्क मधील लीम्बो बुटिकने प्रथम आणला. या बुटिकने जीन्स धुतल्या आणि त्यावर काही कट मारले म्हणजे त्या फाडल्या आणि काय आश्चर्य, पाहता पाहता त्या जनतेत प्रचंड लोकप्रिय झाल्या.


सुरवातीच्या जीन्स निळ्या आणि ब्राऊन अश्या दोन रंगात होत्या. गडद रंगामुळे त्या खराब झालेल्या दिसत नसत. पण त्यातही निळ्या रंगाच्या जीन्स अधिक लोकप्रिय ठरल्या त्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळात. अमेरिकन सैनिक ऑफ ड्युटी या रंगाच्या जीन्स वापरत. आता मात्र अनेक रंगात जीन्स मिळतात.


जीन्सची क्वालिटी पहायची असेल तर नुसता रंग किंवा ब्रांड पाहून उपयोग नाही तर जीन्सची परीक्षा खिशांवरून करावी असे म्हणतात. लेविसने सर्वप्रथम जीन्सचे खिसे धातूची बटणे लावून अधिक मजबूत बनविले. त्यावेळी पुढचे आणि मागचे खिसे अश्या धातूच्या बटनांसह असत पण ग्राहकांनी मागच्या खिशाची बटणे सोफा, खुर्चीत अडकतात अश्या तक्रारी केल्या होत्या. प्रथम जीन्सच्या झिप वेगळ्या पॅटर्नच्या असत. म्हणजे लेडीज जीन्सन चेन साईडला असे तर जेन्ट्स जीन्ससाठी ती मधोमध असे. आता मात्र लेडीज आणि जेन्ट्स जीन्सच्या झिप मधोमध असतात.

Leave a Comment