इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंना मुंबईत येण्याआधी करावे लागणार हे काम


मुंबई: पुढील महिन्यात भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून भारतीय खेळाडू इंग्लंडला पोहोचल्यानंतर सर्व प्रथम न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका होईल.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी पूर्ण प्लॅन तयार केला आहे. सूत्रांच्या हवाल्याने एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार १९ मे रोजी मुंबईत भारतीय खेळाडूंना पोहोचायचे आहे. खेळाडूंना मुंबईत येण्याआधी तीन वेळा आरटी पीसीआर टेस्ट करावी लागणार आहे.

तीनही RT-PCR टेस्ट भारतीय खेळाडूंना त्यांच्या घरीच करायच्या आहेत. टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर ते १९ मे रोजी मुंबईसाठी रवाना होऊ शकतील. इंग्लंडला रवाना होण्याआधी खेळाडूंना १४ दिवस भारतात क्वारंटाइन रहावे लागणार आहे. त्यानंतर २ जून रोजी सर्वजण इंग्लंडसाठी रवाना होतील. इंग्लंडला रवाना होण्याआधी सर्व भारतीय खेळाडूंना कोरोनाची पहिली लस दिली जाणार आहे. त्यानंतर दुसरी लस इंग्लंडमध्येच देण्याची शक्यता आहे.

भारतीय संघात दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या रविंद्र जडेजा आणि हनुमा विहारी यांचा समावेश करण्यात आला आहे. अभिमन्यू ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि अर्जुन नगवासवाला यांना निवड समितीने स्टॅडबाय ठेवले आहे.

असा आहे भारतीय संघ- रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवला, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल (फिटनेसवर ठरणार), वृद्धीमान साहा (फिटनेसवर ठरणार).