कोरोनामुक्त झालेल्या राजीव सातव यांची प्रकृती खालावली, झाला न्युमोनियाचा संसर्ग


पुणे : पाच दिवसांपूर्वीच काँग्रेस खासदार आणि गुजरातचे प्रभारी राजीव सातव यांनी कोरोनावर मात केली होती. पण, त्यांची प्रकृती आज पुन्हा एकदा खालावली असून त्यांना न्युमोनियाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गटातून चिंता व्यक्त केली जात आहे.

एप्रिल महिन्यात खासदार राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. अखेर उपचाराअंती 10 मे रोजी त्यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यामुळे लवकरच राजीव सातव यांना रुग्ण्यालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता होती. पण, आता अचानक राजीव सातव यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना न्युमोनियाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात येण्याची शक्यता असल्चाचे वृत्त एबीपी माझा वृत्तवाहिनीने दिले आहे. राजीव सातव यांची प्रकृती खालावल्याचे वृत्त हाती आल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलकडे धाव घेतली आहे. राजीव सातव यांच्यावर जहांगीर हॉस्पिटलमध्ये गेल्या 22 दिवसांपासून उपचार सुरू आहे.