पुढील आठवड्यात लाँच होणार ‘DRDO’चे अँटी-कोविड औषध २-डीऑक्सी-डी-ग्लूकोज


नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्यालाटेने देशात उग्र रुप धारण केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सध्या लसीकरण मोहिम सुरू आहे. पण देशात लोकसंख्येच्या तुलनेत लसीचा तुटवडा जाणवत आहे. त्याचबरोबर ऑक्सिजनची देखील कमतरता जाणवत आहे. लसीकरणात भर टाकण्यासाठी पुढील आठवड्यापासून स्फुटनिक लस बाजारात उपलब्ध होणार आहे. या व्यतिरिक्त आणखी एक औषध लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे कोरोनाबाधितांना बराच दिलासा मिळू शकेल. पुढील आठवड्यात डीआरडीओने विकसित केलेले अँटी-कोविड औषध २-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (२-डीजी) चे १०,००० डोस बाजारात उपलब्ध होणार आहेत.

याबाबतची माहिती देताना संरक्षण संशोधन व विकास संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुढील आठवड्यात कोरोना औषध ‘२ डीजी’च्या १०,००० डोसची पहिली तुकडी बाजारात उपलब्ध होईल. कोरोनाबाधिताला हे औषध त्वरीत बरे करते आणि ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे. त्याचबरोबर औषध उत्पादक भविष्यात या औषधाचे उत्पादन वेगाने करण्यासाठी काम करीत असल्याची माहिती डीआरडीओच्या उत्पादकांनी दिली आहे.

अशा वेळी २-डीजी औषध मंजूर झाले आहे, जेव्हा भारत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ग्रस्त आहे आणि देशाच्या आरोग्याच्या पायाभूत सुविधांवर प्रचंड दबाव आहे. डीआरडीओच्या पथकाने हे औषध विकसित केले आहे. संकटाच्या वेळी एक वरदान मानले जाणारे हे औषध तयार करण्यात तीन वैज्ञानिकांचा सहभाग होता. यामध्ये डॉ. सुधीर चंदना, डॉ. अनंत नारायण भट्ट आणि डॉ. अनिल मिश्रा हे होते. हे औषध एका पॅकेटमध्ये येते, ते पाण्यामध्ये विरघळल्यानंतर प्यावे लागते.

संरक्षण मंत्रालयाने या औषधाबद्दल म्हटले होते की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मोठ्या संख्येने रूग्णांना ऑक्सिजन आणि रुग्णालयात दाखल करण्यात यात आहे. या पार्श्वभूमीवर हे औषध जीव वाचवण्यासाठी बहुमोल असणार आहे. कारण ते संक्रमित पेशींवर कार्य करते. हे कोरोनाबाधिताचा हॉस्पिटलायझेशन कालावधी कमी करते.