जेरुसलेम- तीन धर्मियांचे पवित्र स्थान

जेरुसलेम हे एक महत्वपूर्ण लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. दरवर्षी जगभरातून लाखो पर्यटक येथे भेट देतात. मात्र या जागी पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. गेले काही आठवडे पॅलेस्टीनी निदर्शक आणि इस्रायल सेना यांच्यात हाणामारी सुरु आहे. इस्रायलची राजधानी असलेले हे शहर तीन धर्मांचे पवित्र स्थान आहे. या जागेवरून ज्यू आणि पॅलेस्टीनी यांच्यात कित्येक वर्षे वाद असून हे दोघेही जेरुसलेम ही त्यांचीच राजधानी असल्याचा दावा करत आहेत.

ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या तिन्ही धर्माचे हे पवित्र स्थान. इतिहास सांगतो हे प्राचीन ज्यू राज्याचे केंद्र आणि राजधानी होती. येथेच ज्यूंचे पवित्र सालोमन मंदिर होते. इसवी सन पूर्व १० व्या शतकातील हे मंदिर रोमन लोकांनी नष्ट केले होते. बायबल मध्ये त्याचे उल्लेख येतात. आजही या मंदिराचे अवशेष येथे आहेत.

ख्रिश्चन धर्मियांचा मसीहा येशू याला येथेच सुळावर चढविले गेले होते आणि येथेच त्याचे पुनरुथ्थान झाले होते. येथेच चर्च ऑफ होली सेपल्कर – मकबरा असून जगातील कोट्यवधी ख्रिश्चन धर्मियांचे हे मुख्य केंद्र आहे. येथे प्रार्थना करण्यासाठी जगभरातून मोठ्या संख्येने ख्रिश्चन दरवर्षी येतात. या शहरात १५० पेक्षा जास्त चर्चेस आणि ७० पेक्षा जास्त मशिदी आहेत.

या ठिकाणी अनेक स्थळे पाहण्यासारखी आहेत. प्राचीन अक्सा मशीद येथेच आहे. इस्लाम धर्माचा उदय येथे झाला असे सांगतात. पैगंबर मोहमद याच ठिकाणाहून स्वर्गात गेले असे मानले जाते. या ठिकाणी रोज हजारो मुस्लीम प्रार्थना करण्यासाठी येतात. जेरुसलेम मध्ये म्युझियम, याद भसीन, डेव्हिड घुमट, नोबेल अभयारण्य, सोलोमन टेम्पल अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत.