ऑस्ट्रेलियात करोनामुळे नाही पण उंदरांच्या त्रासाने धास्तावले नागरिक

भयंकर अश्या करोना विषाणूने जगाला एकीकडे वेठीला धरले असताना ऑस्ट्रेलियाने करोनावर यशस्वी मात केली आहे. मात्र येथील नागरिक उंदरांच्या वाढत चाललेल्या प्रचंड संखेने पुन्हा एकदा प्लेगला सामोरे जावे लागेल या भीतीने हैराण झाले आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्स भागात उंदीर इतक्या प्रचंड संखेने वाढले आहेत की पहावे तिथे उंदीर अशी अवस्था झाली आहे. हे उंदीर शेतातील पिके नष्ट करत आहेतच पण कारखान्यातील माल, गोदामातील धान्याचा फडशा पाडत आहेत. शेतात, घरात सर्वत्र या उंदरांचे साम्राज्य आहे. नुकताच या संदर्भातील एक व्हिडीओ ऑस्ट्रेलियातील पत्रकार लुसी हिने शेअर केला असून त्यात आकाशातून उंदीर पडत असल्याचे दिसते आहे. त्यातील काही उंदीर मेलेले तर काही जिवंत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार धान्य साठविण्यासाठी एका गोदामाची पाईपने सफाई सुरु असताना पंप वापरला गेला तेव्हा हजारो उंदीर वर उडून जमिनीवर पडले. त्यातले अनेक मेलेले होते. हे उंदीर नुसती धान्य नासाडी करून थांबलेले नाहीत तर ग्रामीण भागातील हॉस्पिटल मध्ये घुसून रुग्णांना चावे घेत आहेत. उंदरांच्या लेंड्या आणि मुत्रामुळे लाखो टन धान्य खराब झाले असून दुषित झालेले हे धान्य जाळून टाकण्याची पाळी आली आहे.

उंदरांच्या या उपद्रवामुळे हिवाळी पिके धोक्यात आली आहेत पण मरणाऱ्या उंदरांमुळे प्लेगची साथ पसरेल या भीतीने नागरिक अधिक धास्तावले आहेत.