CBSE चा बारावीच्या परीक्षांबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही


नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशभरात मोठ्या प्रमाणावर बाधित सापडू लागले आहेत. काही राज्यांनी या पार्श्वभूमीवर बोर्डाच्या १०वी आणि १२वीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत, तर काही राज्यांमध्ये फक्त १०वीच्या परीक्षा रद्द करण्यात येऊन १२वीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पण, यासंदर्भात केंद्रीय बोर्ड असणाऱ्या CBSE ने स्वतंत्र भूमिका घेतली आहे. १०वीच्या परीक्षा याआधीच रद्द करण्याचा निर्णय सीबीएसईने जाहीर केला आहे. पण, त्यावेळी १२वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे बोर्डाने स्पष्ट केले होते. या परीक्षा नेमक्या कधी होतील? याविषयी कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. या पार्श्वभूमीवर अर्धा मे महिना उलटूनही अद्याप त्यावर निर्णय न झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोनाबाधितांची संख्या देशभरात चिंताजनक अशा वेगाने वाढू लागली आहे. त्याचबरोबर मृतांचा आकडा देखील दिवसेंदिवस नवनवे उच्चांक गाठत असताना देशातील आरोग्यव्यवस्थेवर याचा ताण येऊ लागला आहे. काही विद्यार्थी आणि पालकांकडून त्या पार्श्वभूमीवर १२वीच्या बोर्डाच्या परीक्षा देखील रद्द करण्यात याव्या अशी मागणी केली जात होती. पण, CBSE कडून त्यासंदर्भात अद्याप कोणताही सकारात्मक प्रतिसाद आलेला नाही.

सीबीएसईने १४ एप्रिल रोजी बोर्डाच्या १०वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. हा निर्णय खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये घेतल्याचे पीटीआय या वृत्तसंस्थेने म्हटल्यामुळे देशातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता १०वी सोबतच आता १२वीच्या परीक्षा देखील रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी केली जाऊ लागली आहे. गेल्या वर्षी मार्चपासून देशभरातील शाळा बंदच आहेत. काही शाळांनी कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी झाल्यानंतर शाळा पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न देखील केला. पण, कोरोनाची काही विद्यार्थ्यांना लागण झाल्यानंतर पुन्हा शाळा बंद करण्यात आल्या.

सामान्यपणे फेब्रुवारी-मार्च महिन्यात सीबीएसईच्या १२वीच्या परीक्षा घेतल्या जातात. त्या कोरोनाच्या परिस्थितीत ४ मेपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. पण, नंतर त्या अनिश्चितकाळासाठी पुढे ढकलण्यात आल्यामुळे नेमकी परीक्षा होणार की नाही? आणि झाली तर कधी होणार? याविषयी पालकांच्या मनात संभ्रमाची परिस्थिती आहे.