आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार; ज्येष्ठ नागरिकाला पहिला डोस ‘कोव्हॅक्सिन’चा तर दुसरा ‘कोव्हिशिल्ड’चा


जालना – एकीकडे कोरोना लसींचा तुटवडा देशामध्ये जाणवत असतानाच दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये लसीकरणासंदर्भातील एक मोठा बेजबाबदारपणा उघडकीस आला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या जालना जिल्ह्यामध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला दोन वेगवेगळ्या लसींचे डोस देण्यात आले आहेत. या व्यक्तीला पहिला डोस ‘कोव्हॅक्सिन’चा देण्यात आला होता. तर दुसरा डोस ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा देण्यात आला आहे. या व्यक्तीला दुसऱ्या डोसनंतर त्रास होत असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. डॉक्टर सध्या या व्यक्तीच्या आरोग्यावर लक्ष ठेऊन आहेत.

जालन्यातील खांडवी गावात राहणारे ७२ वर्षीय दत्तात्रय वाघमारे यांना परतूर येथील एका ग्रामीण रुग्णालयामध्ये २२ मार्च रोजी ‘कोव्हॅक्सिन’चा डोस देण्यात आला होता. त्यानंतर लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी त्यांना ३० एप्रिल रोजी बोलवण्यात आले. दुसऱ्या डोससाठी दत्तात्रय गेले असता, तेव्हा त्यांना सृष्टी गावातील आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध असणाऱ्या ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा डोस देण्यात आला.

टाइम्स ऑफ इंडियाला वाघमारे यांचा मुलगा दिंगबर याने दिलेल्या माहितीनुसार दुसरा डोस घेतल्यानंतर दत्तात्रय यांना ताप आला होता आणि त्यांची त्वचा कोरडी पडली होती. लसीचे साईड इफेक्ट जाणवू लागल्यानंतर दत्तात्रय यांना दिंगबरने परतूर येथील आरोग्य केंद्रामध्ये नेले. तिथे त्यांना काही औषध देण्यात आल्यानंतर तेथील डॉक्टरांनी लसीकरणासंदर्भातील माहिती असणारी कागदपत्रे दुसऱ्या दिवशी तपासली असता दत्तात्रय यांना दोन वेगवेगळ्या लसींचे डोस देण्यात आल्याचे उघड झाले.

डॉक्टरांची एक टीम कागदपत्रे आणि कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनंतर दत्तात्रय यांची तपासणी करण्यासाठी त्यांच्या घरी पोहचली. दत्तात्रय यांची काही वर्षांपूर्वीच बायपास सर्जरी झाल्याची माहिती मुलाने डॉक्टरांना दिली. माझे आई वडील अशिक्षित असल्यामुळेच त्यांनी लसीचा कोणता डोस देत आहेत, यासंदर्भातील माहिती घेतली नाही. घडलेला प्रकार हा लसीकरण केंद्रावरील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणातून घडला आहे. आधी कोणती लस देण्यात आली आहे, त्याची तपासणी न करताच दुसरी लस वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दिल्याचे दिगंबर यांनी म्हटे आहे. औरंगाबाद विभागाचे आरोग्य उपनिर्देशक स्वप्निल लाले यांनी या प्रकऱणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे सांगितले आहे.