मुंबई, पुण्यासह मराठवाड्यासाठी रायगड जिल्हा ठरला जीवनरक्षक


अलिबाग- देशभरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. देशीतील अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनअभावी रुग्ण दगावल्या घटना घडल्या आणि घडत आहेत. ऑक्सिजनची कमतरता महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी जाणवत असल्यामुळे देशातील वेगवेगळ्या ठिकाणाहून रेल्वे आणि जलमार्गाने ऑक्सिजन आणला जात आहे. अशा ऑक्सिजन टंचाईच्या कठीण काळात रायगड जिल्हा हा राज्यासाठी जीवरक्षकाप्रमाणे धावून आला आहे. राज्यभरात रायगड जिल्ह्यातून दररोज ६३० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे.

ऑक्सिजनचे रायगड जिल्ह्यात पेण डोलवी, तळोजा आणि माणगाव याठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात आहे. पेण डोलवी येथील जेएसडब्लू कंपनीत २२४ मेट्रिक टन, तळोजा येथील कंपनीतून २३२ मेट्रिक टन, तर माणगाव येथील कंपनीतून १८० मेट्रिक टन ऑक्सिजन दररोज उत्पादित केला जात आहे. त्याचबरोबर अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ६ मेट्रिक टन ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. या सर्व प्रकल्पातून दररोज ६५० मेट्रिक टन ऑक्सिजन तयार होत आहे. जिल्ह्याला लागणारा ऑक्सिजन ठेऊन उर्वरित सर्व ऑक्सिजनचा साठा राज्यातील विविध भागात पुरवला जात आहे.

ऑक्सिजनची कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी मोठ्या प्रमाणात गरज भासत असल्यामुळे कृत्रिम ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा परिस्थितीत रायगड जिल्हा राज्यासाठी ऑक्सिजन मोठा पुरवठादार म्हणून समोर आला आहे. जिल्ह्यातून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नांदेड, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी तसेच इतर जिल्ह्यांना आत्तापर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे.

ऑक्सिजनची रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निर्मिती होत असल्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात ऑक्सिजनअभावी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. दररोज ३० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज जिल्ह्याला भासते, यातील सहा मेट्रिक टन ऑक्सिजन जिल्हा रुग्णालयातील प्रकल्पातून तयार होतो. उर्वरित गरज ही औद्योगिक कंपन्याकडून तसेच ऑक्सिजन पुरवठादारांकडून भागत असल्यामुळे रायगड जिल्ह्यात कुठेही ऑक्सिजनची कमतरता जाणवली नाही.