कोरोना नियम धाब्यावर बसवून गोव्याला जाणाऱ्या पृथ्वी शॉला पोलिसांनी रोखले


सिंधुदुर्ग: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातलेले असून दररोज काही लाखोंच्या संख्येत कोरोनाबाधित आढळत आहेत. त्याचबरोबर मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण देखील अधिक आहे. कोरोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात देखील वाढत आहे. मुंबईत हे प्रमाण अधिक असल्यामुळेच सरकारने लॉकडाऊनची घोषणा केलीय. राज्यातील नागरिकांना मुक्तपणे बाहेर फिरता येत नाही. अतिशय आवश्यक आणि गरजेच्या कामासाठी परवानगी घेतल्यानंतरच नागरिकांना बाहेर प्रवास करण्याची मुभा आहे.

दरम्यान राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांची भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज सलामीवीर पृथ्वी शॉला जाणीव नसल्यामुळेच कोणतीही परवानगी आणि नियमांचे पालन न करता फिरणाऱ्या पृथ्वी शॉला पोलिसांनी अडवले.

आयपीएलचा १४वा हंगाम कोरोनामुळे स्थगित करण्यात आला आहे. स्पर्धेतील फक्त २९ सामने खेळवण्यात आल्यामुळे भारतीय क्रिकेटपटूंना मोठा वेळ उपलब्ध झाला आहे. त्याचबरोबर पुढील महिन्यात होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल आणि इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी पृथ्वी शॉची निवड झाली नाही. त्यामुळे पृथ्वीकडे बराच मोकळा वेळ आहे. या मोकळ्या वेळी पृथ्वीने फिरायला जाण्याचा बेत आखला.

नियमित विमान सेवा कोरोनामुळे बंद आहे. यामुळेच पृथ्वी शॉने गोव्याला जाण्यासाठी कोल्हापूर-कोकण असा मार्ग निवडला. गाडीतून निघालेल्या पृथ्वीच्या सहलीला मोठा सेटबॅक तेव्हा बसला, जेव्हा अंबोली पोलिसांनी त्याला अडवले आणि ई-पासची विचारणा केली. राज्य सरकारच्या नियमानुसार राज्यातून बाहेर जाणाऱ्या व्यक्तीकडे ई-पास गरजेचा आहे.

तसा ई-पास पृथ्वी शॉकडे नव्हता. ई-पास असल्याशिवाय प्रवास करता येणार नाही असे त्याला पोलिसांनी सांगितले. यावर त्याने पोलिसांना गोव्यात जाण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली. पण पोलिसांनी नकार दिला. गोव्यात जाण्याच्या तयारीने बाहेर पडलेल्या पृथ्वीने फोनवरून ई-पाससाठी अर्ज केला. त्यानंतर काही तासांनी जेव्हा पृथ्वीला पास मिळाला, तेव्हा कुठे पोलिसांनी त्याला गोव्याला जाण्याची परवानगी दिली.