देशात काल दिवसभरात 3 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त


नवी दिल्ली – देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट बऱ्या प्रमाणात ओसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पण अद्याप संकट म्हणावे तसे टळलेले नाही. दरदिवशी कोरोना महामारीमुळे जवळपास चार हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने नुकत्याच जारी करण्यात आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार काल दिवसभरात 3,43,144 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 4000 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 3,44,776 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. यापूर्वी बुधवारी 362,727 नव्या बाधितांची नोंद झाली होती.

तर दूसरीकडे देशभरात 17 कोटी 92 लाख 98 हजार 584 नागरिकांचे 13 मेपर्यंत लसीकरण करण्यात आले होते. काल दिवसभरात 20 लाख 27 हजार 162 लसीचे डोस दिले गेले आहेत. तसेच आतापर्यंत 31.13 कोटींहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 18.75 लाख कोरोना सॅम्पल्स तपासण्यात आले. ज्याचा पॉझिटिव्ह रेट 18 टक्क्यांहून अधिक आहे.

तर देशातील कोरोनाचा मृत्यूदर 1.09 टक्के आहे, तर रिकव्हरी रेट 83 टक्क्यांहून अधिक आहे. तसेच कोरोनाबाधितांची संख्या जवळपास 16 टक्क्यांवर पोहोचली आहे. कोरोना सक्रिय रुग्णांच्या संख्येत भारत जगात दुसऱ्या स्थानी आहे. एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येतही भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर जगभरात अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.

महाराष्ट्रात देखील कोरोनाचा प्रभाव कमी होताना दिसत आहे. नवीन रुग्णांची आकडेवारी कमी होत असून तुलनेने डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची आकडेवारी जास्त येत आहे. राज्यात काल (गुरुवार) 42582 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 54535 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 46,54,731 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.34% एवढे झाले आहे.

काल राज्यात 850 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 1.5 % एवढा आहे.राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,03,51,356 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 52,69,292 (17.36टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात 35,02,630 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 28,847 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात काल रोजी एकूण 533294 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुंबईत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत कालच्या तुलनेत गुरुवारी पुन्हा घट झाली आहे. मुंबईत काल 1,946 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 2,037 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 68 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या मुंबईत 38 हजार 649 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईत काल 2116 कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. तर 4293 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मुंबईचा डबलिंग रेट हा आता 189 दिवसांवर गेला आहे. तर बरे होण्याचे प्रमाण 92 टक्क्यांवर गेले आहे.