राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून मुस्लिम बांधवांना ‘रमजान ईद’ निमित्त शुभेच्छा


मुंबई : पवित्र अशा रमजान महिन्याची सांगता अर्थात ईद-उल-फित्र (रमजान ईद) च्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, रमजान नियम पालन, संयम आणि परस्परांप्रती प्रेम, आदरभाव यांची शिकवण देणारा असा सण असतो. यातून मिळालेल्या ऊर्जेतून प्रेरणा घेऊ आणि कोरोना संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न करूया. नियमांचे काटेकोर पालन करून, सर्वांना आरोग्य मिळेल अशी काळजी घेऊया. ईदचा उत्साह- उत्सव सुख-समृद्धी आणि आरोग्यदायी संपन्नता घेऊन यावा ही प्रार्थना. मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.

त्याचबरोबर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील ईद-उल-फित्र (रमजान ईद) निमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. रमजानच्या पवित्र महिन्यात उपवास, प्रार्थना व परोपकाराला महत्त्व दिले आहे. कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. त्यामुळे यावर्षी देखील रमजान ईदचा सण घरी राहून तसेच शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून साजरा करावा, असे आवाहन करतो. ही ईद जीवनात आनंद, आरोग्य व संपन्नता घेऊन येवो, अशी प्रार्थना करतो व सर्वांना विशेषतः मुस्लिम भगिनी – बंधूंना रमजान ईदच्या शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला ‘ईद-उल-फित्र’ तथा ‘रमजान ईद’च्या शुभेच्छा दिल्या असून यंदाची ‘ईद’ सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशी प्रार्थना केली आहे. रमजान ईद आपल्याला त्याग, संयम, परोपकार, विश्वबंधूत्वाची, सर्वांशी प्रेमाने वागण्याची शिकवण देते. कुटुंबासोबत ईद साजरी करताना समाजातील गरीब, दुर्बल, वंचित बांधवांनाही आनंदात सहभागी करुन घ्यावे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करावे. स्वत:ला, कुटुंबाला, समाजाला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्याचा निर्धार करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘रमजान ईद’निमित्ताने दिलेल्या शुभेच्छा संदेशात केले आहे.