सिंगल डोस व्हॅक्सीन स्पुटनिक लाइटच्या मंजुरीवर सरकार पुढच्या महिन्यात घेणार निर्णय


नवी दिल्ली – रशियाची व्हॅक्सीन स्पुटनिक V ची डिलीवरी देशात सुरू झाल्याच्या दिवशीच याबाबत एक चांगली बातमी आली आहे. सूत्रांनुसार, भारतात स्पुटनिक लाइट वापराची मंजुरी मिळवणारी पहिली सिंगल डोस व्हॅक्सीन ठरु शकते. कारण पुढील महिन्यात सरकार आणि रेगुलेटर अथॉरिटीमध्ये याविषयावर चर्चा होणार आहे. या लसीच्या वापरानंतर 10 दिवसांमध्ये 40 टक्के अँटीबॉडी विकसित होते. दरम्यान आजपासून डॉ. रेड्डीज लॅबोरेट्रीजने शुक्रवारीच ही स्पुटनिक-V ची डिलीवरी सुरू केली आहे. यासाठी एका डोसची किंमत 995.40 रुपये ठरवण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वीच रशियाने कोरोनाच्या सिंगल डोस व्हॅक्सीन बनवण्यात यश संपादन केले आहे. स्पुटनिक फॅमिलीतील ही नवीन लस आहे. ज्याचा सध्या यूरोप आणि अमेरिका वगळता जगातील 60 देशांमध्ये वापर होत आहे. स्पुटनिक लाइटला मॉस्कोच्या गामेलिया रिसर्च इंस्टीट्यूटने बनवले आहे.

रशियन डायरेक्ट इंवेस्टमेंट फंडने (RDFI) स्पुटनिक-V प्रमाणे यालाही अर्थसहाय्य केले आहे. RDFI चे CEO किरिल दिमित्रिएव यांच्यानुसार, जगभरात याची किंमत 10 डॉलर (जवळपास 730 रुपये) पेक्षा कमी राहिल.

700 लोकांचा समावेश या व्हॅक्सीनच्या फेज-3 ट्रायलमध्ये करण्यात आला आहे. ट्रायल रशिया, संयुक्त अरब अमिरात आणि घानामध्ये झाले. याचा डेटा 28 दिवसांनंतर एनालाइज करण्यात आला. याच्या परिणामांमध्ये दिसले की, ही लस कोरोनाच्या सर्व नवीन स्ट्रेनवर प्रभावी आहे. याच्या डेटानुसार ही लस दुसऱ्या डबल डोस लसींपेक्षा जास्त प्रभावी आहे.

  • याची ओव्हरऑल एफिकेसी 79.4% आहे. लस घेणाऱ्या 100% लोकांमध्ये 10 दिवसांनंतरच अँटीबॉडीज 40 टक्क्यांनी वाढल्या.
  • लस घेणाऱ्या सर्व लोकांमध्ये कोरोना व्हायरसच्या S-प्रोटीन विरोधात इम्यून रिस्पॉन्स डेव्हलप झाल्या.
  • या लसीचे सिंगल डोस असल्यामुळे जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये लसीकरण वाढवले जाऊ शकेल.
  • स्पुटनिक लाइटला 2-8 डिग्री तापमानावर स्टोअर केले जाऊ शकते. यामुळे हे सहज वाहतुक होऊ शकेल.
  • ज्या लोकांना पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली आहे, त्यांच्यावरही ही लस परिणामकारक आहे.

लस घेतल्यानंतर कोरोनाच्या गंभीर परिणामांचा धोका कमी होतो. जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये कोरोनाबाधितांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडणार नाही.

दरम्यान लवकरच भारतात अमेरिकन कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनची सिंगल डोस व्हॅक्सीन उपलब्ध होऊ शकते. खरेतर जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीवर रक्त गोठल्यामुळे अमेरिका आणि दक्षिण अफ्रिकेत याच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती. आता अमेरिकेने याच्या वापरावरील बंदी हटवली आहे. आतापर्यंत वापरल्या जाणाऱ्या सर्व कोरोना लसीचे दोन डोस घ्यावे लागतात.