श्रीनगरच्या दाल लेक मधील अनोखी शिकारा अँब्युलंस

काश्मीरच्या अतिसुंदर दाल लेक मध्ये शिकारा बोटीतून भटकंती करण्याचा अनुभव अनेकांनी घेतला असले. जगभरात प्रसिद्ध असलेल्या या निसर्गसुंदर सरोवरावर करोनाची छाया आहे. २०२० पर्यंत पर्यटकांचे आकर्षण केंद्र असलेले हे सरोवर सध्या तसे शांत असले तरी येथे तरंगत असलेली अनोखी शिकारा अँब्युलंस आकर्षणाचे केंद्र बनली आहे.

या शिकारा बोटीचे मालक तारिक पतलू त्यांच्या या शिकारा अँब्युलंस मधून दाल सरोवराच्या आतील भागात राहणाऱ्या नागरिकांना करोनाची माहिती देऊन त्यांच्यात जागृती करत आहेतच पण कुणा गरजुचा एसओएस कॉल आला की त्वरित मदतीसाठी हजर होत आहेत. शिकारा बोटीची अँब्युलंस बनविण्याचा निर्णय घेण्यासाठी कारणीभूत झाली एक घटना.

करोनाच्या पहिल्या लाटेत तारिक यांनाच करोना संसर्ग झाला. ते आयसोलेशन मध्ये गेले पण त्यांची प्रकृती बिघडली त्यामुळे हॉस्पिटल मध्ये न्यावे लागले. तेथून बरे होऊन परत आल्यावर त्यांना त्यांच्या हाउसबोटी पर्यंत नेण्यासाठी कुणी शिकारावाले तयार होईनात. तेव्हाच आपल्या शिकारांची अँब्युलंस बनविण्याचा निर्णय तारिक यांनी घेतला. एका ट्रस्टच्या मदतीने त्यांनी हे काम पार पाडले. त्यांच्या शिकारा अँब्युलंस मध्ये स्ट्रेचर, व्हीलचेअर, कोविड संदर्भातील गरजेचे सामान म्हणजे पीपीई किट, मास्क, गरजेची काही प्राथमिक औषधे आहेत. ते रोज दाल सरोवरात दुरवर फेरी मरून कुणाला काही आवश्यक सामान हवे असेल तर त्याची पूर्तता करतात. एसओएस कॉल आला की रुग्णाला आतील भागातून बाहेर आणून हॉस्पिटल मध्ये नेण्याची सुविधा त्यामुळे मिळू शकते.

तारिक यांनी दोन महिन्यांची मेहनत आणि १२ लाख रुपये खर्च करून ही शिकारा अँब्युलंस बनविली आहे.