करोना काळात भारतीय, सकस अन्ना बरोबरच दारू खरेदीत अव्वल

करोना काळात बदललेल्या खरेदी पद्धतीत भारतीयांनी सकस अन्न आणि मद्य खरेदीला अधिक प्राधान्य दिल्याचे एका सर्व्हेक्षणात दिसून आले आहे.  हे सर्व्हेक्षण शहरी भागात केले गेले होते. करोना मुळे जगभरात शॉपिंग पद्धतीत मोठा बदल झाला आहे. या संदर्भात १७ देशात ग्लोबल मार्केट रिसर्च कंपनी युगोव्हने एक आंतरराष्ट्रीय सर्व्हेक्षण केले आहे. त्यात शॉपिंग पद्धतीत झालेले हे बदल दीर्घकाळ असेच राहतील असे अनुमान काढले गेले आहे. विशेष म्हणजे ज्या १७ देशात मार्केट मोठे आहे त्याच देशांचा यात समावेश केला गेला आहे. करोना मुळे भारतात बऱ्याच भागात लॉक डाऊन अथवा कर्फ्यू सारखी परिस्थिती आहे. त्यामुळे शॉपिंगचा हाच ट्रेंड येथे आणखी वाढेल असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

सर्व्हेक्षण करताना भारत, मेक्सिको यासारख्या विकसित देशांवर अधिक लक्ष दिले गेले होते. त्यानुसार ६६ टक्के भारतीयांनी पहिल्यापेक्षा अधिक लक्ष फळे, भाज्या, दुध उत्पादने खरेदीवर दिल्याचे दिसून आले आहे.  फास्ट फूड खरेदीत अन्य देशात खरेदी प्रमाण २८ टक्के कमी झाले आहे तर भारतात हाच आकडा ४७ टक्के आहे. पॅकेज फूड खरेदी या काळात अन्य देशात १५ टक्के कमी झाली आहे तर भारतात ती ३२ टक्के कमी झाली आहे.

मात्र याच काळात भारतात मद्याचा खप करोनामुळे वाढला असून तो २९ टक्क्यांवर गेला आहे. चीन मध्ये हाच खप २७ टक्के आहे. या दोन देशाच्या बाजारात पहिल्यापेक्षा जास्त मद्य खरेदी केली जात आहे.

भारत, इंडोनेशिया, मेक्सिको या देशात करोना काळात लोकल बिझिनेसला प्राधान्य दिले गेल्याचेही दिसून आले आहे. या सर्व देशात किराणा दुकाने आहेत. एकट्या भारतात ७० लाख किराणा दुकाने असून मेडिकल आणि पान दुकानांचा त्यात समावेश केला तर ही संख्या १ कोटीपेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे या वेळी ग्राहकांनी अनावश्यक खरेदीला फाटा दिला असून यादी बनवून त्याप्रमाणे खरेदी करण्यास प्राधान्य दिल्याचे दिसून आले आहे. भारतात हे प्रमाण ९० टक्के, इंडोनेशियात ९२ टक्के आहे.