आयपीएल रद्द झाली तरी खेळाडूंना मिळणार पूर्ण वेतन

भारतात करोना उद्रेकामुळे आयपीएल स्पर्धा अनिश्चित कालपर्यंत स्थगित केली गेली आहे. ही स्पर्धा रद्द झाली तरी खेळाडूंना पूर्ण वेतन दिले जाणार असल्याचे समजते. ही स्पर्धा रद्द झाली तर बीसीसीआयला २२०० कोटींचे नुकसान होईल असा अंदाज आहे. या स्पर्धेतील २९ सामने पार पडले आहेत. बाकी सामने कधी होतील या विषयी आत्ताच काही सांगता येणार नसल्याचे आयपीएल संयोजक सांगतात. मात्र सप्टेंबर मध्ये उर्वरित सामने घेतले गेले तर इंग्लंडचे खेळाडू त्यात सहभागी होऊ शकणार नसल्याचे इंग्लिश क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ऑस्ट्रेलियाचे खेळाडू डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स, स्टीव्ह स्मिथ याना पूर्ण वेतन दिले जाणार आहे. ही स्पर्धा रद्द झाल्यास कव्हर म्हणून अनेक फ्रेंचाईजीनी विमा कव्हर घेतले आहे. त्यात खेळाडूंना कव्हर केले गेले आहे. त्यामुळे स्पर्धा रद्द झाली तरी ऑस्ट्रेलिया खेळाडूंना १८ दशलक्ष डॉलर्स दिले जाणार आहेत. सध्या ऑस्ट्रेलियाचे खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि कोच मालदीव मध्ये असून त्यांना सर्वाना सुरक्षित मायदेशी पाठविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. १५ मे पासून ऑस्ट्रेलियाच्या सीमा खुल्या केल्या जात आहेत.

बीसीसीआय आणि आयपीएल फ्रांचाईजी कंपन्या खेळाडूंसाठी चार्टर विमानाची व्यवस्था करणार असल्याचे सांगितले जात आहे. भारतात करोना स्थितीत सुधारणा झाली नाही तर आयपीएलचे उर्वरित सामने इंग्लंड किंवा युएई मध्ये घेण्याचा विचार सुरु असल्याचे समजते.