मुंबई महापालिकेच्या जागतिक निविदांना अनेक कंपन्या प्रतिसाद देतील, पण केंद्र सरकारच्या परवानगी अभावी त्यांची अडवणूक होईल : खासदार राहुल शेवाळे


मुंबई : मुंबई शहरासाठी एक कोटी कोरोना लसींची जागतिक निविदा बृह्नमुंबई महानगरपालिकेने काढली आहे. आता त्यावरुनही राजकारण सुरु होण्याची शक्यता आहे. मुंबईला लस पुरवठा लसींसाठी जागतिक निविदा काढल्यानंतरही होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. मुंबईला जागतिक निविदा काढूनही लस मिळाली नाही तर ते अपयश केंद्राचे असेल, असे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे.

जगभरातील अनेक कंपन्या बृह्नमुंबई महानगरपालिकेच्या जागतिक निविदासाठी उत्सुक असून योग्य असा प्रतिसाद त्या देतील. पण त्यांची केंद्र सरकारच्या परवानगी अभावी अडवणूक होईल, असा आरोप शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केल्यामुळे बृह्नमुंबई महापालिकेच्या जागतिक निविदांचा उद्देश साध्य व्हायचा असेल तर त्याला केंद्राच्या सहकार्याची आवश्यक्ता असल्याचे शेवाळे म्हणाले.

महानगरपालिकेने कोरोना लसीसाठी जागतिक निविदा काढण्याचे काम केले. त्याला ज्यावेळी कंपन्या प्रतिसाद देतील, तेव्हा त्यांना परवानगी देण्याची जबाबदारी केंद्र सरकारची असल्याचे राहुल शेवाळे म्हणाले. देशात फायझर, मॉडर्ना आणि इतर लसींना अजून परवानगी नाही. स्पुटनिक या रशियाच्या लसीचा साठा भारतात यापूर्वीच डॉ. रेड्डी फार्मा यांच्याकडे आला आहे. पण, त्यांना डोमेस्टिक सप्लायचे लायसन्स नाही. हे लायसन्स मिळण्यासाठी कमीत कमी 2 महिन्यांचा कालावधी लागेल, असे त्यांनी सांगितले.

या आधीच कंपन्यांनी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचा पुरेसा पुरवठा करण्यास असमर्थता दाखवली आहे. कोव्हिशिल्डकडून 1 कोटी लसीचा पुरवठा महाराष्ट्र राज्याला होऊ शकतो. कोव्हॅक्सिन लसीचा दर महिन्याला केवळ 10 लाख पुरवठा होऊ शकतो. त्यामुळे या कंपन्यांकडूनही पुरेसा पुरवठा व्हायला हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान भाजप नेते प्रसाद लाड खासदार राहुल शेवाळेंच्या या आरोपाला उत्तर देताना म्हणाले की, ग्लोबल टेंडरचा बागुलबुवा लोकांची दिशाभूल करण्यासाठी उभा केला जातो आहे. मुंबईत लस पुरवठा कमी पडणार नाही, यासाठी केंद्रासोबत संपर्क साधून देवेंद्र फडणवीस प्रयत्न करतील. राज्यात, देशात आणि संपूर्ण जगात भारतातील कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्डची मागणी आहे. येथेच जर लसींचे उत्पादन, पुरवठा होत असेल तर ग्लोबल टेंडरच्या मागे का धावत आहोत. शिवसेनेला फक्त केंद्राकडे दरवेळेस बोट दाखवण्याचे काम येते.