देशात कोरोनामुळे गेल्या 24 तासात 4120 जणांनी गमावले जीव


नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासात 3,62,727 नवीन कोरोनाबाधितांची भर पडली असून 4,120 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात बुधवारी 3.48 लाख नवीन कोरोनाबाधितांची भर पडली होती तर 4,205 रुग्णांचा मृत्यू झाला होता. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण हे 1.09 टक्के एवढे झाले आहे, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 83 टक्के एवढे झाले आहे.

आतापर्यंत देशात 17 कोटी 72 लाख 14 हजार 256 जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. तर काल दिवसभरात 18 लाख 94 हजार 991 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होताना दिसत आहे. राज्यात बुधवारी 46 हजार 781 नवीन कोरोनाबाधितांचे निदान झाले, तर 58,805 रुग्णांना कोरोनामुक्त झाल्यामुळे घरी सोडण्यात आले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88 टक्के एवढे झाले आहे. राज्यात बुधवारी 816 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.4 टक्के एवढा आहे.