कोरोनाबाधितांसाठी पिंपरी चिंचवडमध्ये १४०० ऑक्सिजनयुक्त बेड्स उपलब्ध!


पुणे – कोरोनाबाधितांसाठी गेल्या महिन्यात बेड्स उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना मोठी कसरत करावी लागत होती. पण, गेल्या महिन्यापेक्षा या महिन्यात परिस्थिती सुधारल्याचे चित्र दिसत आहे. पिंपरी-चिंचवडमधील सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये एकूण १४०० ऑक्सिजनयुक्त बेड्स उपलब्ध आहेत, पण व्हेंटिलेटर बेड्सच्या बाबतीत मात्र परिस्थिती फारशी चांगली नाही.

याबाबत माहिती देताना पिंपरी-चिंचवडचे आरोग्य सचिव डॉ. अनिल रॉय यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील कोविड केअर सेंटर, खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये मिळून एकूण १,४०४ ऑक्सिजनयुक्त बेड्स उपलब्ध आहेत. सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये मिळून एकूण ३,८०८ ऑक्सिजनयुक्त बेड्स आहेत. त्यापैकी २,४०४ बेड्सवर रुग्ण उपचार घेत आहेत तर १,४०४ ऑक्सिजन बेड्स अद्यापही रिक्त आहेत. दररोज बरे होणाऱ्या अथवा मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांच्या संख्येनुसार रिक्त होणाऱ्या बेड्सची संख्या बदलत राहते.

डॉ. रॉय यांनी व्हेंटिलेटर बेड्सच्या बाबतीत सांगितलं की, सध्या व्हेंटिलेटर बेड्सची कमतरता आहे. पिंपरी चिंचवड परिसरात सध्या खासगी रुग्णालयांमध्ये केवळ १० व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध आहेत. सरकारी रुग्णालयांमध्ये एकही व्हेंटिलेटर बेड शिल्लक नसल्याचे रॉय यांनी सांगितले.

त्याचबरोबर अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केवळ १०४ आयसीयू बेड्स वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर ऑक्सिजनची सुविधा नसणारे १,३०० बेड्स रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. पिंपरी चिंचवड भागात १३५ कोविड रुग्णालये आणि २२ कोविड केअर सेंटर्स आहेत.

तसेच पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त आरोग्य प्रमुख डॉ. पवन साळवे यांनी सांगितले की गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मार्च-एप्रिलसारखी वाढ दिसून आलेली नाही. गेल्या महिन्याभरात उपचाराधीन रुग्णांची संख्या २३ हजाराच्या वर होती. आता रुग्णसंख्या २१ हजारांच्या खाली आलेली आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, शहरात सध्या ५ हजार ९९० रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर १४ हजार ९३० रुग्ण होम क्वारंटाईन आहेत.