या राजाला होता उंच सैनिकांचा शौक

जगात सणकी माणसे खूप असतात. राजे रजवाड्यांच्या काळात तर राजे, बादशहा, सुलतान यांच्या विक्षिप्त पणाच्या अनेक कथा आजही ऐकायला मिळतात. कुणी क्रूर म्हणून, कुणी दयाळू, कुणी उदार म्हणून अश्या कथातून लक्षात राहतात. पण असाही एक राजा होता ज्याची आवड किंवा शौक विचित्र म्हणावा लागेल. या राजाला उंच सैनिक तैनात करण्याचा शौक होता आणि अश्या सैनिकांना तो भरभक्कम पगार देत असे. विशेष म्हणजे या सैनिकांना युद्धासाठी प्रशिक्षण दिले जात नसे.

जर्मनीतील प्रशा राज्याचा हा राजा. त्याचे नाव होते पहिला फ्रेडरिक विलियम. त्याने १७१३ ते १७४० या काळात राज्य केले. नंतर हे राज्य १९३२ मध्ये जर्मनीत विलीन केले गेले. हा फ्रेडरिक राजा शांत, दयाळू होता पण त्याला उंच सैनिक विशेष पसंत होते. त्याने उंच सैनिकांची एक वेगळी तुकडी तयार केली होती. तो राजा होण्याअगोदर या राज्यात ३८ हजार सैनिक होते. फ्रेडरिक राजा गादीवर आला तेव्हा त्यांने सैनिकांची संख्या ८३ हजारावर नेली.

त्याच्या विशेष उंच सैनिक तुकडीचे नामकरण ‘पॉटसडॅम जायंटस’ असे केले गेले होते आणि त्या तुकडीत असलेल्या सैनिकांची उंची किमान ६ फुट होती. त्यातील सर्वात उंच सैनिक होता जेम्स किकीलंड. त्याची उंची ७ फुट १ इंच होती. ही तुकडी फक्त दिखाव्यापुरती होती कारण त्यांना युद्धाचे प्रशिक्षणच नव्हते. राजा जेव्हा उदास असेल तेव्हा या सैनिकांना महालात बोलावत असे. तेथे हे सैनिक राजाचे मनोरंजन नृत्य करून करत. कधी कधी राजा त्यांना मार्च करून दाखवायला सांगत असे.

हा राजा मृत्यू पावला तेव्हा ५१ वर्षाचा होता आणि त्याच्या उंच सैनिक तुकडीत ३ हजार सैनिक होते. राजाच्या मृत्युनंतर अनेक वर्षे ही रेजिमेंट कायम होती पण नंतर १८०६ मध्ये त्याच्या मुलानेच ही तुकडी बरखास्त करून टाकली असे सांगितले जाते.