इस्रायल मध्ये सापडला माणसाच्या चेहऱ्याच्या आकाराचा खास दिवा

जादूच्या दिव्याबद्दल आपण गोष्टीतून ऐकलेले असते. या दिव्याच्या आकार चित्रात वेगळाच दाखविलेला असतो शिवाय हा दिवा घासला की त्यातून राक्षस किंवा जिन बाहेर येतो असेही आपल्या मनावर ठसलेले असते. इस्रायल मध्ये असाच एक अंदाजे १९०० वर्षापूर्वीचा अनोखा दिवा सापडला आहे. या दिव्यामुळे संशोधक आणि वैज्ञानिक बुचकळ्यात पडले आहेत. डेविड नॅशनल पार्क जेरुसलेम मध्ये हा दिवा मिळाला असून तो तेलावर तेवणारा दिवा आहे.

हा दिवा काश्यापासून म्हणजे ब्राँझ धातू पासून बनविला गेला आहे. दिव्याची रचना हसणाऱ्या माणसाच्या चेहऱ्याप्रमाणे आहे. पूर्वी रोमन नाटकात जसे मास्क किंवा मुखवटे वापरले जात तश्या प्रकारचा हा चेहरा आहे. सापडलेल्या दिव्याचा अर्धाच भाग मिळाला आहे. सपाट पृष्ठभाग किंवा भिंतीवर हा दिवा टांगला जात असावा असे पुरातत्व तज्ञांचे म्हणणे आहे. धार्मिक संस्कारात याचा वापर होत असावा असाही एक तर्क असून हा दिवा ‘ गुड लक्’ साठी वापरला जात असावा असाही अंदाज आहे.

हा दिवा सापडल्यावर हंगेरी येथील पुरातत्व तज्ञांचा सल्ला घेतला गेला असून तेथेही असाच एक तेलाचा अर्धा दिवा बुडापेस्ट मधील रोमन अवशेषात मिळाला होता. इस्रायल मधील दिवा हा त्या दिव्याचा उरलेला भाग आहे काय हे तपासण्यासाठी या दिव्याचे थ्री डी मॉडेल बनवून ते हंगेरीला पाठविले जाणार आहे असे समजते.