कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द होणार टीम इंडियाचा श्रीलंका दौरा?


कोलंबो : विराट कोहली आणि अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडिया जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळणार आहे. भारताच्या युवा खेळाडूंना या दौऱ्यात संधी मिळणार असल्यामुळे सर्व युवा खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पण कोरोनाचे सावट या दौऱ्यावर आहे. गेल्या 2 दिवसांमध्ये श्रीलंकेतील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे या दौऱ्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मंगळवारी 11 मे रोजी श्रीलंकेत कोरोनाच्या 2 हजार 568 नव्या रुग्णांची नोंद झाली. यापैकी 38 रुग्ण हे परदेशातून प्रवास करुन आले आहेत. तर 10 मे रोजी 2 हजार 624 रुग्ण आढळले होते. त्यामुळे या दौऱ्यावर कोरोनाचे सावट आहे.

सामन्यानिमित्ताने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी खेळाडूंना प्रवास करावा लागतो. त्यामुळे या प्रवासादरम्यान खेळाडूंना कोरोनाची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोरोनाच्या सुरुवातीपासून एकाच ठिकाणी सर्व सामने खेळवण्याचा कळ हा संबंधित क्रिकेट मंडळाचा असतो. त्यानुसार या श्रीलंका दौऱ्याचंही आयोजन हे प्रेमदासा स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. एकाच ठिकाणी संपूर्ण मालिका खेळण्याचा आमचा मानस आहे. या एकदिवसीय आणि टी 20 अशा दोन्ही मालिकेतील सामने येथेच खेळवण्याची आमची योजना असल्याची माहिती श्रीलंका क्रिकेटचे चेअरमेन अर्जुन डी सिल्वा यांनी दिली.

या दौऱ्यासाठी टीम इंडिया 5 जुलैला श्रीलंकेत पोहचेल. त्यानंतर पुढील आठवडा भारतीय संघ क्वारंटाईन राहिल. यानंतर 13 जुलैपासून 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होईल. तर त्यानंतर 22 जुलैपासून टी 20 मालिकेचा शुभांरभ होईल. अर्जुन डी सिल्वा पुढे म्हणाले, एकदिवसीय आणि टी 20 मालिका होणार की नाही, हे सर्व जुलैमधील परिस्थितीवर अवलंबून असेल. कोरोनामुळे स्टेडियममध्ये क्रिकेट चाहत्यांना प्रवेश नसेल. त्यामुळे हे सर्व सामने विना प्रेक्षक खेळवण्यात येतील.

दरम्यान पृथ्वी शॉ, शिखर धवन, देवदत पडिक्कल, सूर्यकुमार यादव, इशान किशन, संजू सॅमसन, मनिष पांडे, ऋतुराज गायकवाड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, राहुल तेवतिया, शिवम दुबे, विजय शंकर, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप सैनी, हर्षल पटेल, खलील अहमद, जयदेव उनादकट, चेतन सकारिया, वरुण चक्रवर्ती, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, राहुल चहर या खेळाडूंचा भारताच्या संभाव्य संघात समावेश होऊ शकतो.