भारत बायोटेकची 2 ते 18 वयोगटातील मुलांवर चाचणीसाठी शिफारस


नवी दिल्ली : लहान मुलांना कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत लागण होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे. येत्या काही दिवसात कोरोना महामारीविरोधातील या लढाईत आता मुलांसाठी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लसीची 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणीसाठी एका तज्ज्ञ समितीने मंगळवारी शिफारस केली आहे. ही शिफारस दुसऱ्या/तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी करण्यात आल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमधील मेडिट्रिना मेडिकल सायन्स इन्स्टिट्यूट, दिल्ली तसेच पाटण्यातील एम्ससह विविध ठिकाणी ही चाचणी केली जाईल.

भारत बायोटेकने 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये सुरक्षा आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच इतर गोष्टींचं आकलन करण्यासाठी कोव्हॅक्सिन डोसच्या दुसऱ्या/तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी परवानगी देण्याची विनंती केली होती. मंगळवारी (11 मे) भारत बायोटेकच्या विनंतीवर केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था म्हणजेच सीडीएससीओच्या कोविड-19 विषयक तज्ज्ञ समितीने विचारविनिमय केला. त्यानंतर प्रस्तावित दुसरे/तिसरे टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी देण्याची शिफारस समितीने केल्याचे समजते.

आयसीएमआर आणि भारत बायोटेकने काही दिवसांपूर्वी तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे निष्कर्ष जाहीर करताना म्हटले होते की सामान्य कोरोनाबाधित रुग्णांवर कोव्हॅक्सिन ही लस 78 टक्के प्रभावी आहे. त्याचबरोबर अमेरिकेचे वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सने कोरोनाच्या डबल म्यूटेंटविरोधात अँटीबॉडी बनवण्याचे काम भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन करते, असे वृत्त प्रकाशित केले होते.

दरम्यान देशातील विविध राज्यांमध्ये भारत बायोटेकने आपल्या कोव्हॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरवठा सुरु केला आहे. भारत बायोटेक कंपनीने ट्वीटद्वारे ही माहिती दिली आहे. आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओदिशा, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा यात समावेश आहे.