कोरोनामुळे अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील ४४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू


अलिगढ – एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असताना अलिगढ मुस्लिम विद्यापीठात गेल्या काही दिवसांत ४४ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. यामध्ये १९ प्राध्यापकांचा समावेश आहे. तर उर्वरित २५ कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी आहेत. प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विद्यापीठात येणाऱ्या काही दिवसांत अजून कोरोनाबाधित आढळण्याची तसेच मृत्यूची भीती व्यक्त होत आहे.

यासंबंधी आयसीएमआरला अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरु तारिक मन्सूर यांनी पत्र लिहिले आहे. हे मृत्यू प्राणघातक कोरोनामुळे झाल्याचे त्यांनी पत्रात म्हटले असून यासंबंधी अधिक शोध घेण्याची विनंती केली आहे. अलिगढ मुस्लिम विद्यापीठ आणि आजुबाजूच्या परिसराशी जोडलेल्या सिव्हिल लाईन्स परिसरात एखादा जीवघेणा विषाणू संक्रमित होत असल्याच्या शंकेला, यामुळे बळ मिळत आहे, असा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे. दरम्यान चाचणीचे नमुने तपासासाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेकडे (सीएसआयआर) पाठवण्यात आले आहेत.

विद्यापीठाची स्मशानभूमी आता पूर्ण भरली असून ही खूप मोठी शोकांतिका आहे. अनेक मोठे डॉक्टर, वरिष्ठ प्राध्यापकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये डीन, चेअरमन यांचाही समावेश होता. निरोगी आणि तंदुरुस्त असणाऱ्या अनेक तरुणांचाही मृत्यू झाला असल्याची माहिती राज्यशास्त्राच्या प्राध्यापक डॉक्टर आर्शी खान यांनी दिली आहे.