दिल्ली सरकारच्या आरोपांना कोव्हॅक्सिनची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेकचे उत्तर


नवी दिल्ली – सध्या भारतातील नागरिकांना सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने उत्पादित केलेली कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकने तयार केलेली कोव्हॅक्सिन या दोन लसींचे डोस दिले जात आहेत. त्यामध्ये कोव्हिशिल्डचा मोठा हिस्सा असला, तरी कोव्हॅक्सिनच्या लसीही मोठ्या प्रमाणात दिल्या जात आहेत. पण, काही राज्यांकडून कोव्हॅक्सिनचा पुरवठा कमी होत असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यावर आता भारत बायोटेकच्या सहायक व्यवस्थापकीय संचालिका सुचित्रा इल्ला यांनी ट्वीट करत कंपनीच्या वतीने नाराजी व्यक्त केली आहे. हे फार वेदनादायी असल्याचे त्या म्हणाल्या आहेत. दिल्ली सरकारने अशा प्रकारची तक्रार नुकतीच केली असून कोव्हॅक्सिनचा पुरवठा केंद्र सरकारच्या सूचनांवरून केला जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

ट्वीट करून सुचित्रा इल्ला यांनी भारत बायोटेक कंपनीची भूमिका स्पष्ट केली आहे. कोव्हॅक्सिनचे डोस १०/५/२१ रोजी पाठवण्यात आले आहेत. जवळपास १८ राज्यांना हे डोस पाठवण्यात आले आहेत. पण आमच्या हेतूंविषयी काही राज्यांकडून शंका घेतल्या जात आहेत हे आमच्या टीमसाठी वेदनादायी आहे. कोरोनाची आमच्या ५० कर्मचाऱ्यांना लागण झाल्यामुळे ते सुट्टीवर आहेत. पण, तरीदेखील या साथीच्या संकटामध्ये आम्ही २४ तास आणि सातही दिवस तुमच्यासाठी काम करत असल्याचे सुचित्रा इल्ला आपल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या आहेत.

कोव्हॅक्सिन लसीचे डोस देण्यास भारत बायोटेकने नकार दिल्याचा दावा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केला आहे. मनिष सिसोदिया यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिल्लीने कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डचे प्रत्येकी ६७ लाख असे एकूण १ कोटी ३४ लसींचे डोस पुरवण्याची मागणी केली होती, अशी माहिती दिली. पण भारत बायोटेकने लसींचे डोस पुरवण्यास आपण असमर्थ असल्याचे दिल्ली सरकारला कळवले आहे. यावेळी त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार लसींचा पुरवठा केला जात असल्याचे कळवले, असे सिसोदिया म्हणाले.

दरम्यान, आपल्या ट्वीटसोबत या १८ राज्यांची यादीही सुचित्रा इल्ला यांनी पोस्ट केली आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरयाणा, जम्मू-काश्मीर, झारघंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू, त्रिपुरा, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश असल्याचे त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमधून दिसून येत आहे.