बी.१.६१७ या कोरोनाच्या उपप्रकाराबाबत होत असलेले सर्व दावे निराधार – केंद्र सरकार


नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना कोरोनाचा एक नवा भारतीय उपप्रकार समोर आल्याचे सांगितले जात होते. पण हा उपप्रकार भारतीय नसून यासंदर्भात करण्यात आलेले सर्व दावे हे निराधार आणि सत्यावर आधारित नसल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआयने केंद्र सरकारने दिलेल्या माहितीच्या हवाल्याने दिले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने अनेक प्रसारमाध्यमांना बी.१.६१७ हा कोरोनाचा उपप्रकार जागतिक चिंतेचा विषय असल्याचे सांगितले होते. पण हा उपप्रकार भारतीय असल्याचा दावा काही माध्यमांनी केला आहे. पण, माध्यमांमध्ये करण्यात आलेले हे दावे निराधार असून सत्याधारीत नसल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, बी.१.६१७ हा कोरोनाचा उपप्रकार भारतीय असल्याचा दावा ज्या जागतिक आरोग्य संघटनेच्या कागदपत्रांच्या हवाल्याने करण्यात आला आहे, त्यात भारतीय या शब्दाचा उल्लेखच नसल्याचे सांगितले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या उपप्रकाराविषयी ३२ पानी परिपत्रक काढले आहे. पण यात कुठेही ‘भारतीय’ हा उल्लेख करण्यात आलेला नसल्याचे देखील केंद्र सरकारने सांगितले आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये प्रथम महाराष्ट्रात बी.१.६१७ हा कोरोनाचा उपप्रकार सापडला होता. हा उपप्रकार आता २१ देशांमध्ये सापडला आहे. पण, हा कोरोनाचा उपप्रकार भारतीय असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले नसल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. कोरोनाचा नवा उपप्रकार जागतिक आरोग्य संघटनेच्या ६ विभागांमधील ४४ देशांमध्ये आढळून आले आहेत. गेल्या वर्षी भारतात सर्वप्रथम बी.१.६१७ हा कोरोनाचा उपप्रकार सापडला होता. त्याची वर्गवारी जागतिक चिंतेचा विषय म्हणून करण्यात आल्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले आहे.