रामदेवबाबांच्या कंपनीने विकत घेतली ही कंपनी

रुची सोया इंडस्ट्रीजने मंगळवारी पंतजलीच्या नॅचरल बिस्कीट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे अधिग्रहण केल्याची घोषणा केली आहे. रुची सोयाने ६०. ०२ कोटी रुपयात ही कंपनी खरेदी केल्याचे सांगितले जात आहे. १० मे रोजी संचालक मंडळाच्या या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या असून अधिग्रहणाची प्रक्रिया पुढील दोन महिन्यात पूर्ण केली जाणार आहे. दोन हप्त्यात ठरलेली रक्कम रुची सोया पतंजली बिस्कीटला देणार आहे.

या अधिग्रहणानुसार कंपनीचे सध्याचे असेट, लायबेलीटीज, सर्व परवाने व परमिट रुची सोयाला हस्तांतरित होणार आहेत. विशेष म्हणजे २०१९ मध्ये पतंजलीने रुची सोया कंपनी ४३५० कोटी रुपयांना खरेदी केली होती. त्यासाठी ३२०० कोटींचे कर्ज घेतले गेले होते. रुची सोया आणि पंतांजली बिस्कीट कंपनी यात खरेदी विक्री व्यवहार दिसत असला तरी दोन्ही कंपन्या पतंजलीच्याच आहेत हे विशेष. रुची सोया न्यूट्रीन, महाकोश, रुची गोल्ड, रुची स्टार, सनरिच ब्रांड व्यवसाय करते. ही कंपनी कर्जात बुडाली होती.

पतंजली उद्योगाची सुरवात रामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्ण यांनी २००६ मध्ये केली. या कंपनीचे ९९.६ टक्के शेअर्स आचार्य बालकृष्ण यांच्या कडे आहेत. रामदेव बाबा कंपनीचे सह संस्थापक असून रुची सोया मध्ये बाबा नॉन एग्झीक्यूटीव्ह, नॉन ईंडीपेंडंट डायरेक्टर आहेत.