बॉनचीन सोबत सेल्फी घेण्यासाठी जीव टाकतात जपानी मुली

आपल्याकडे रस्त्यात कुठेही गर्दी दिसली की कुणी तरी सेलेब्रिटी आला असे खुशाल समजावे. मग ते कुणी राजकीय नेते अथवा बॉलीवूड सितारे असतील तर सेल्फी घेण्यासाठी एकच झुंबड उडणे साहजिकच. पण जपान मध्ये मुली टोक्यो शहराच्या भर रस्त्यात बॉनचीन सोबत सेल्फी घेण्यासाठी जीव टाकतात. विशेष म्हणजे बॉन कुणी अभिनेता, नेता नाही तर ते आहे एक अवाढव्य कासव. जपान मध्ये बॉनचीन सेलेब्रिटी कासव आहे. संथ चालीने ते त्याच्या मालकासोबत रस्त्यावर फिरायला निघते तेव्हा लोक त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी करतात. त्याची अति संथ चाल आणि त्याच्या संथ चालीबरोबर हळू चालणारा त्याचा मालक मितानी हिसाओ ही जपान मधील लोकप्रिय जोड्गोडी बनली आहे.

मिसाओ यांनी हे कासव २० वर्षापूर्वी बाजारातून खरेदी केले होते. पहिली दहा वर्षे ते घरातच फिरत असे. हळू हळू ते मोठे झाले. सुरवातीला तळ हाताएवढे असलेला बॉनचीन आता ७० किलोचा झाला असून त्याचे कवच ३० इंची आहे. बॉनचीन घराबाहेर पडला की त्याच्याभोवती गर्दी जमते. लहान मुले त्याच्या पाठीवर बसून सैर करतात. मालक मिसाओ त्याला विविध प्रकारचे आकर्षक कपडेही घालतो. मिसाओला त्याच्या माघारी या कासवाची काळजी कोण घेणार याची विवंचना आहे. त्यामुळे तो या कासवासाठी नवीन मालकाच्या शोधात आहे.