बहारीन प्रिन्सच्या टीमने सर केले एव्हरेस्ट, नोंदविले नवे रेकॉर्ड

बहारीनचे प्रिन्स मुहम्मद हमद मुहम्मद अल खलीफा यांनी त्यांच्या १६ सदस्य टीम सह एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली असून नवे रेकॉर्ड नोंदविले आहे. त्यांनी त्यांच्या रॉयल गार्ड टीम बरोबर एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केले असून एव्हरेस्टच्या नव्या उंचीवर पोहोचणारी ही पहिली आंतरराष्ट्रीय टीम ठरली आहे.

प्रिन्सच्या या मोहिमेचे आयोजन सेवन समिट ट्रॅकने केले होते. अध्यक्ष मिन्गामा शेर्पा या संदर्भात माहिती देताना म्हणाले, ही टीम पहाटे साडेपाच ते पावणे सात च्या दरम्यात शिखरावर पोहोचली. नेपाळ पर्यटन विभागाच्या संचालक मीरा आचार्य म्हणाल्या, एव्हरेस्टच्या नवीन उंचीवर पोहोचलेली ही पहिली आंतरराष्ट्रीय टीम आहे. अनेक वाद आणि चर्चा झाल्यावर २०१५ मध्ये झालेल्या प्रलयंकारी भूकंपानंतर नेपाळ सरकारने एव्हरेस्टची उंची पुन्हा एकदा मोजण्याचा निर्णय घेतला होता. ही उंची वाढल्याचे दिसून आले होते.

बहारीनची टीम १५ मार्चला काठमांडू येथे दाखल झाली होती. एव्हरेस्ट शिखर सर करण्याची या टीमची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी त्यांनी लोबूचे शिखर, माउंट मनायु सर् केले आहे. रॉयल गार्ड हे बहारीनच्या संरक्षण सेनेचे युनिट आहे.