देशातील करोना स्थितीमुळे जी ७ समिट साठी न जाण्याचा मोदींचा निर्णय

देशातील करोना परिस्थिती अद्यापी वाईट अवस्थेत असल्याने ग्रुप ऑफ सेवन म्हणजे जी ७ शिखर परिषदेसाठी ब्रिटनला न जाण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. पुढच्या महिन्यात म्हणजे जून मध्ये ११ ते १३ तारखेदरम्यान ही परिषद कोर्नवेल येथे होणार असून ब्रिटनचे पंतप्रधान आणि परिषदेचे यजमान बोरीस जॉन्सन यांनी मोदी याना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रण दिले होते.

विदेश मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार देशातील करोनाची सद्यस्थिती पाहता या परिषदेला न जाण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला आहे. विशेष पाहुणे म्हणून आमंत्रण दिल्याबद्दल मोदींनी जॉन्सन यांचे आभार मानले आहेत.

कॅनडा, फ्रांस, जर्मनी, इटली, जपान, अमेरिका, ब्रिटनसह युरोपीय संघ जी ७ मध्ये सामील आहेत्त. यंदा ब्रिटनच्या अध्यक्षतेखाली ही शिखर परिषद होत आहे. ब्रिटनने भारत, ऑस्ट्रेलिया, द, कोरिया व द. आफ्रिका देशांना या परिषदेचे आमंत्रण दिले आहे. करोना प्रकोप झाल्यापासून मोदी यांचा हा रद्द झालेला दुसरा परदेश दौरा आहे. त्यापूर्वी मोदी पोर्तुगाल येथे भारत युरोपीय संघ शिखर परिषदेसाठी जाणार होते. हे संमेलन डिजिटल माध्यमातून पार पडले.