बनावट रेमडेसिविरच्या विक्री प्रकरणी विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याला अटक


नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातलेले असतानाच आरोग्य सुविधांचा अनेक राज्यांमध्ये तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक राज्ये केंद्राकडे बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिविरसाठी मदत मागत आहेत. यादरम्यान अनेक राज्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या नातेवाईकांना लूटत औषधांचा काळाबाजार सुरु असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान मध्य प्रदेश पोलिसांनी अशा प्रकारे सुरु असलेला बनावट रेमडेसिविरचा काळाबाजार उद्ध्वस्त केला असून चौघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याचाही समावेश आहे.

मध्य प्रदेश पोलिसांनी विश्व हिंदू परिषदेचे नर्मदा विभागाचे प्रमुख सरबजीत सिंह मोखा यांना अटक केली आहे. जबलपूरच्या सिटी रुग्णालयाचेही सरबजीत हे प्रमुख आहेत. इंदूर येथून ५०० रेमडेसिविर इंजेक्शन मिळवत रुग्णालयामधील कोरोना रुग्णांना दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सरबजीत यांचे मॅनेजर देवेंद्र चौरसीया, सपन जैन यांचा अटक करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे. त्यांच्यावर औषध कंपन्यांसोबत डिलरशीपची जबाबदारी होती.

बनावट रेमडेसिविरची निर्मिती करणाऱ्या कंपनीचा गुजरात पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. सपन जैन यांना ७ मे रोजी जबलपूर येथून अटक करण्यात आली. दरम्यान विश्व हिंदू परिषदेने पोलिसांच्या कारवाईनंतर सबरजीत यांना पदावरुन काढून टाकले असून त्यांच्यावर कडक कारवाई केली जावी, अशी मागणी केली आहे.

आम्ही नुकतेच अतिरिक्त पोलिस अधीक्षक पदावरील अधिकाऱ्याची रेमडेसिविर तसेच ऑक्सिजनचा काळाबाजार रोखण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. आम्ही काळाबाजार रोखण्यासाठी त्यांची साखळी तोडण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती जबलपूरचे पोलीस महानिरीक्षक भगवत सिंग यांनी दिली आहे.