12 ते 15 वयोगटातील बालकांच्या लसीकरणास अमेरिकन FDA ची मंजुरी


वॉशिग्टन : फायझर-बायोएनटेकची कोरोना लस 12 वर्षावरील बालकांना देण्यास अमेरिकेच्या अन्न आणि औषधे प्रशासनाकडून (FDA) मंजुरी मिळाली आहे. अमेरिकेच्या लसीकरणाच्या कार्यक्रमातील आणि कोरोना विरोधातील लढ्यातील हा एक महत्वाचा निर्णय आहे. अशा प्रकारची मान्यता देण्याचा प्रस्ताव गेल्या आठवड्यात अन्न आणि औषधे प्रशासनासमोर (FDA) आला होता.

कोरोनाच्या भविष्यातील लाटेविरोधात लहान मुलांना कोरोनाची लस देण्यामुळे संरक्षण मिळेल असा कयास अमेरिकेतील तज्ज्ञांकडून मांडला जात आहे. आता आपल्या मुलांना कोरोनाची लस द्यावी, असे आवाहनही अमेरिका सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. कोरोनाची लस अमेरिकेत 12 ते 15 वयोगटातील बालकांना देण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आलंे आहे. अमेरिकेतील 16 वर्षावरील सर्वांना फायझरची लस देण्याच्या निर्णयाला या आधीच मंजुरी मिळाली आहे.

12 ते 15 वयोगटातील बालकांवर आपल्या लसीच्या उपयुक्ततेचा अभ्यास फायझर कंपनीने गेल्या महिन्यापूर्वीच केला आहे. त्यामध्ये ही लस बालकांवरही प्रभावी आणि सुरक्षित असल्याचा दावा फायझरच्या वतीने करण्यात आला आहे.

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले अमेरिकेतील नागरिक आता विनामास्क घराबाहेर फिरु शकतात. छोट्या ग्रुपमध्ये या नागरिकांना भेटता येईल, परंतु त्यांनी गर्दीची ठिकाणे टाळावीत. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेन्शन अमेरिकेच्या या संस्थेने गेल्या आठवड्यात हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेतील नागरिकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. याआधी कोरोनामुक्त झालेल्या इस्रायलने देखील अशाच प्रकारचे पाऊल उचलले होते. तिथेही काही नियमांसह विनामास्क घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. इस्रायलमधील सुमारे 60 टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे.