जागतिक आरोग्य संघटनेचा कोरोनावरील उपचारात ‘इव्हर्मेक्टिनचा’ वापर न करण्याचा सल्ला


नवी दिल्ली – कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी इव्हर्मेक्टिन या औषधाचा वापर न करण्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेच्या वैज्ञानिकांनी दिला आहे. हे औषध न वापरण्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेच्या वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी ट्विट करत दिला आहे. सोमवारी १८ वर्षावरील सर्वांना हे औषध देण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला होता. त्यानंतर डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी ही माहिती दिली आहे.

कोणतेही औषध नवीन लक्षणांसाठी वापरण्याआधी त्याची सुरक्षितता आणि क्षमता जाणून घेणे महत्वाचे आहे. जागतिक आरोग्य संघटना कोणत्याही चाचण्याशिवाय कोरोना उपचारासाठी इव्हर्मेक्टिन वापरण्यास परवानगी देत नसल्याचे डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


जर्मनीच्या हेल्थकेअर आणि लाईफ सायन्सेस कंपनी मर्कचे एक जुने विधान डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी ट्विटरवर शेअर केले आहे. यामध्ये कोरोनाच्या उपचारासाठी इव्हर्मेक्टिनच्या क्षमता तपासण्यासाठी वैज्ञानिक अभ्यास करत आहे. आता पर्यंत कोरोनाच्या उपचारासाठी हे उपयोगी ठरेल, असे कोणतेही प्रमाण मिळाले नसल्याचे म्हटले होते.

जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या दोन महिन्यात दुसऱ्यांदा इव्हर्मेक्टिनचा वापर टाळण्याची सूचना केली आहे. याआधी मार्च महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेने इव्हर्मेक्टिनचा अतिशय कमी प्रभावी असल्याचा दावा केला होता.

अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) इव्हर्मेक्टिनला मान्यता दिली आहे. मलेरियासारख्या आजारांच्या उपचारांसाठी हे औषध वापरले जाते. बहुतेकवेळा आतड्यांसंबंधी स्ट्रॉन्डोलायडायसिस आणि ऑन्कोसरिसियासिस विकार असलेल्या असलेल्या रूग्णांसाठी देखील हे वापरले जाते. कोरोनावरील उपचारांसाठी अजून पर्यंत तरी इव्हर्मेक्टिनला मान्यता मिळाली नसली, तरी जगाच्या विविध भागांमध्ये याचा वापर केल्याने रुग्णांवर हे औषध परिणामकारक ठरले आहे.

अमेरिकन जर्नल ऑफ थेरेपीटिक्सच्या मे-जूनच्या अंकात प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, तोंडाद्वारे इव्हर्मेक्टिन औषधाचा नियमितपणे वापर केल्यास कोरोना व्हायरसचा धोका कमी होण्यास मदत होते. याआधी दोन औषधांच्या मिश्रणाने कोरोनारुग्ण बरे होत असल्याचा दावा बांगलादेशच्या एका वैद्यकिय पथकाने होता. इव्हर्मेक्टिन आणि डॉक्सीसाइक्लिन यांचा या औषधांमध्ये समावेश होता.