अरविंद केजरीवाल यांच्या केंद्राला लसीचे उत्पादन वाढवण्यासाठी काही सूचना


नवी दिल्ली – कोरोनाचा प्रकोप जगासह भारतातही वाढत आहे. देशात सध्या कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेने वेग घेतला आहे. पण देशातील अनेक राज्यात लसींचा तुटवडा जाणवत असल्यामुळे लसीकरणाला खीळ बसली आहे. देशात जाणवत असलेला कोरोना लसीचा तुटवडा दूर करण्यासाठी आणि सर्व राज्यांना कोरोनाची लस मिळण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्राला उपाय सूचवला आहे. ज्यामुळे कोरोना लसीच्या टंचाईचे संकट दूर करता येईल, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

सध्या फक्त दोनच कंपन्या कोरोना लसीचे देशभरात उत्पादन करत आहेत. देशातील इतर कोरोना लसीनिर्मितीची क्षमता असलेल्या कंपन्यांना कोरोना लसनिर्मितीचा फॉर्म्युला देण्यात यावा, ज्यामुळे कोरोना लसीचे उत्पादन वाढेल, असे त्यांनी सांगितले. फक्त दोन कंपन्यांच्या उत्पादनाने लसीकरण केल्यास लसीकरण मोहीम दोन वर्षे लांबण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.

कोरोना लसींचा तुटवडा दिल्लीसह अनेक राज्यात जाणवत आहे. लस नसल्यामुळे काही राज्यांमध्ये लसीकरण सुरूही झालेले नाही. जर लसीकरण याच गतीने सुरू राहिले, तर त्याला दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांचे कोरोनापासून कसे रक्षण होणार, असा सवाल करत कोरोना लसींचे उत्पादन युद्धपातळीवर वाढवत लसीकरणाला गती देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

लस बनवण्याची क्षमता असलेल्या कंपन्यांना लसनिर्मितीचा फॉर्मुला देत त्यांना लसनिर्मितीसाठी परवानगी देण्यात यावी. ज्यामुळे देशातील लसीच्या टंचाईवर मात करता येईल, असे त्यांनी सांगितले. आता काही दिवस पुरेल, एवढेच लसीचे डोस दिल्लीत शिल्लक असल्यामुळे कोरोना लसीची दिल्लीसह देशाला मोठ्या प्रमाणात गरज आहे.