सर्वाधिक कमाई करणाऱ्या कंपन्याच्या यादीत अव्वल स्थानी सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया


नवी दिल्ली – कॉर्पोरेट कंपन्याच्या व्यवहारासंदर्भात माहिती ठेवणाऱ्या कॅपिटलाइनने प्रकाशित केलेल्या नव्या अहवालानुसार भारतातील ४१८ भारतीय कंपन्यांनी सन २०१९-२० मध्ये पाच हजार कोटींहून अधिक रक्कमेचा एकूण व्यापार केला आहे. यामध्ये ‘कोव्हिशिल्ड’ ही कोरोना प्रतिबंधक लस बनवणाऱ्या सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया सर्वाधिक नफा कमवणाऱ्या कंपनींच्या यादीत अव्वल स्थानी आहे.

कोरोनाच्या दोन लसींच्या आप्तकालीन वापरासाठी भारतामध्ये परवानगी देण्यात आली असून यामध्ये सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’चा समावेश आहे. यासंदर्भात लाइव्ह मिंटने दिलेल्या वृत्तानुसार पाच हजार ४४६ कोटींच्या विक्रीच्या मोबदल्यात सीरमने दोन हजार २५१ कोटींचा निव्वळ नफा कमवला आहे. नेट मार्जिनच्या ४१.३ टक्के एवढा हा नफा आहे.

अर्थपुरवठा करणाऱ्या कंपन्या (सिटी बँक, मुथूट फायनान्स सारख्या) या यादीमध्ये प्रामुख्याने तळाला आहेत किंवा मोनोपोली ऑप्रेशन्स क्षेत्रात काम करणाऱ्या (हिंदुस्तान झिंक अ‍ॅण्ड न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशनसारख्या) कंपन्या आहेत. पाच हजार कोटींचा उद्योग करणाऱ्या कंपन्यांच्या यादीमध्ये १८ कंपन्या या औषध क्षेत्राशी संबंधित आहेत. मॅकलेओड्स फार्मास्युटीकल्सचा या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर समावेश आहे. २८ टक्के नफा या कंपनीने कमावला आहे.

सीरम कंपनीच्या नफ्याची टक्केवारी अधिक असण्यामागील मुख्य कारणांपैकी एक म्हणजे भारतामध्ये कंपनी कोरोना प्रतिबंधक लसीची निर्मिती करत असून जगामध्ये सध्या सर्वाधिक लसीची गरज भारतालाच असल्यामुळे जगातील सर्वात मोठी औषध निर्मिती करणारी सीरम ही सर्वाधिक नफा कमवणारी कंपनी ठरली आहे. कंपनीने एप्रिल २०२० मध्ये पहिल्यांदा ऑक्सफर्ड अ‍ॅस्ट्राझेनेकासोबत एकत्र येत कोव्हिशिल्डची निर्मिती केली होती.

हॉर्स ब्रीडींग, बांधकाम व्यवसाय, अर्थसहाय्य, हवाई श्रेत्र यामध्येही सीरमची मालकी असणाऱ्या पुनावाला समुहाने गुंतवणूक केली आहे. सीरमचा महसूल २००८-०९ आणि २०१५-१६ दरम्यान २३ टक्कांनी वाढून वार्षिक स्तरावर ४ हजार ६३० कोटींवर पोहचला. तर निव्वळ नफ्यात २८ टक्के वाढ होत, तो १२ हजार १९१ कोटींवर पोहचला. पण सन २०१५-१६ ते २०१९-२० दरम्यान कंपनीच्या महसुलामध्ये चार टक्क्यांनी घट झाली आणि निव्वळ नफाही या वर्षांमध्ये कायम राहिला.

कंपनीला भारतामध्ये १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ८५ कोटी नागरिकांना लस देण्यासाठी १७० कोटी लसींची गरज भासणार आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या अदर पुनावाला यांनी एका खासगी कंपनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सीरमला तीन हजार कोटींची गरज असून या पैशांमधून दर महिन्याला १० कोटी लसींची निर्मिती करता येईल, असे सांगितले आहे. बँकांकडून किंवा सरकारकडून हा पैसा मिळाला, तरी हरकत नसल्याचे पुनावाला म्हणाले आहेत.