बुधवारपासून तेलंगणात 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन


हैद्राबाद – तेलंगणा राज्यातील कोरोनाबाधितांची वाढती आकडेवारी पाहता बुधवारपासून दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात मंगळवारी मंत्रिमंडळाची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली, त्यामध्ये लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यात आला. सकाळी 6 ते 10 या वेळेत लॉकडाऊन दरम्यान सर्व कामांना सूट देण्यात आली आहे. या बैठकीत कोरोनाची लस खरेदी करण्यासाठी जागतिक निविदा मागविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

तेलंगणामधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. राज्यात सोमवारी कोरोनाचे 4823 नवीन रुग्ण आढळले आणि 32 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात जवळपास 63 हजार कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. ही संख्या सातत्याने वाढत आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत तेलंगणामध्ये 2700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना रुग्णाचा रिकव्हरी रेट 86.94 टक्के आहे. दरम्यान, कोरोनाबाधितांची संख्या आंध्र प्रदेशमध्येही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. आंध्र प्रदेशात सोमवारी ऑक्सिजनच्या अभावामुळे 11 रुग्णांचा मृत्यू झाला.