मियामी बीचवर सुरु आहे करोना लस पर्यटन

अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील लोकप्रिय मियामी बीचवरील वाळूत मौज मस्ती करणारी अनेक माणसे दिसत आहेत त्याचप्रमाणे वाळूत करोना लस घेण्यासाठी रांगा लावून उभे असलेले परदेशी पर्यटक सुद्धा मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. या बीच वर करोना पर्यटन सुरु झाले असून येथे येणाऱ्या परदेशी पर्यटकांना त्यांचे नागरिकत्व न विचारता कोविड १९ लस दिली जात आहे.

येथे येणाऱ्यात लॅटीन अमेरिकेतील इक्वेडोर, अल सल्वादोर, व्हेनेझुएला येथील नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. विओन वेबच्या रिपोर्ट नुसार वरील देशात करोनाचा प्रकोप वाढतो आहे पण त्यांच्याकडे लसीचे डोस कमी आहेत. तेथे लस मिळविणे अडचणीचे होते आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे पैसे आहेत ते येथे येऊन लस घेणे पसंत करत आहेत. त्यातही जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीला सर्वाधिक पसंती मिळत आहे कारण ही सिंगल डोस लस आहे.

या बीचवर दर आठवड्याच्या शेवटी लसीकरणाचे बुथ लावले जात आहेत. लस घेण्यासाठी मोठा खर्च करावा लागत असला तरी परदेशी नागरिक त्याची तयारी दाखवत आहेत. काही देशात फक्त वृद्ध व्यक्तीनाचा लस मिळत आहे अश्या देशातील तरुण येथे येऊन लस घेण्यास प्राधान्य देताना दिसत आहेत.