अमेरिकेने दिली करोना मृतांची खोटी आकडेवारी

अमेरिकेत कोविड १९ मुळे नक्की किती मृत्यू झाले याचा अधिकृत आकडा ५ लाख ९६ हजार असा जाहीर केला गेला असला तर युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन ने कोविड संक्रमणात ९ लाखापेक्षा जास्त मृत्यू झाले असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेचे स्वास्थ्य सल्लागार डॉ. अँथनी फाउची यांनी एका टीव्ही कार्यक्रमात या दाव्याला समर्थन दिल्याने त्याला अधिक पुष्टी मिळाली आहे.

एनबीसी टीव्ही शो मध्ये बोलताना फाउची याना युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनच्या अध्ययनाबाबत प्रश्न विचारला गेला होता. त्यावेळी उत्तर देताना फाउची यांनी कोविड वाटला त्यापेक्षा अधिक जीवघेणा होता अशी कबुली दिली आणि मृत्यू आकडेवारीचे अंडर रिपोर्टिंग (म्हणजे प्रत्यक्ष मृत्यू पेक्षा कमी संख्या सांगणे) झाल्याचे मान्य केले.

फाउची म्हणाले माझ्या मते करोना मृत्यू आकडेवारीचे अंडर रिपोर्टिंग झाले आणि अजूनही सुरु आहे. अर्थात कोविडने नउ लाखापेक्षा अधिक नागरिकांचे बळी घेतले हा आकडा थोडा जास्त वाटतो आहे. पण या अध्यययानामुळे करोनाची नोंद १०० वर्षात पहिली नाही अशी साथ अशी नक्कीच केली जाईल. १९१८ मध्ये आलेल्या इन्फ्ल्यूएन्झा साथीमुळे जगात ५ कोटी मृत्यू झाले होते त्यातील ६.७५ लाख मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले होते. हा आकडा सुद्धा करोना मृत्युपुढे लहान आहे असे ते म्हणाले.

दुसरीकडे अमेरिकेत लॉक डाऊनच्या विरोधात असलेले गट सातत्याने करोना मृत्यूचा आकडा फुगवून सांगितला जात असल्याचे आरोप करत आहेत. या गटाच्या दाव्यानुसार ९४ टक्के मृत्यूंचा करोनाशी संबंध नाही. हे मृत्यू करोना मुळे झाल्याचे सांगून हा आकडा वाढविला जात आहे. माजी अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनीही करोना मृत्यूचा आकडा वाढविला गेल्याचे विधान केले होते. त्यामुळे डॉ. फाउची यांच्या खुलाशा नंतर नवीन वादाला तोंड फुटेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.