राऊतांकडे आम्ही लक्ष देत नाही, अन् त्यांचा सामना देखील वाचत नाही – नाना पटोले


मुंबई – महाराष्ट्रातील महाविकास आघाडीप्रमाणे देश पातळीवर देखील विरोधकांची भक्कम अशी नवीन आघाडी निर्माण होण्याची गरज असल्याचे वक्तव्य काल शिवसेना नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केले होते. त्याचबरोबर काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये आलेल्या अपयशावर देखील त्यांनी भाष्य केले होते.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आता राऊतांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही संजय राऊतांकडे लक्ष देत नाही आणि त्यांचा सामना पेपर देखील वाचत नसल्याचे नाना पटोलेंनी म्हटल्यामुळे त्यामुळे महाविकास आघाडीत कुठेतरी धुसफुस सुरू असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

संजय राऊत काय बोलतात याच्याकडे आमचे लक्ष देखील नसते. आम्हाला त्यांना जे काही सांगायचे होते ते अगोदरच आम्ही सांगितलेले आहे. त्यांचा सामना पेपर देखील वाचणे आम्ही बंद केलेले आहे. त्यामुळे आम्ही माध्यमांद्वारे स्पष्ट सांगितले आहे. ज्या ठिकाणी आमच्या नेत्यावर, संघटनेवर टीका करण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले तर बरे, अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. पण दुसऱ्यावर टीका करून आपला पक्ष मोठा होतो, असे कोणाला वाटत असेल, तर आपल्याकडे देखील चार बोटे आहेत हे त्यांनी लक्षात घ्यावे, असे नाना पटोले यांनी टीव्ही-9 या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे.