काल दिवसभरात तीन लाख ५३ हजार ८१८ रुग्णांची कोरोनावर मात


नवी दिल्ली – देशभरात कोरोनाचा जोर अद्यापही कायम असून, देशभरात दिवसागणिक साडेतीन ते चार लाख नव्या कोरोनाबाधितांची भर पडत आहे. वाढत्या कारोनोबाधितांच्या संख्येच्या विस्फोटामुळे आरोग्य सुविधांवर ताण येताना दिसत असून, वेळेत उपचार न मिळाल्याने, त्याचबरोबर ऑक्सिजन वा इतर सुविधांअभावी बाधितांचे प्राण जात आहे. देशातील मृत्यूदर अद्यापही कायम असून, देशात दररोज साडेतीन ते चार हजारांच्या सरासरीने मृत्यू होत असल्यामुळे कोरोना बळींची संख्या अडीच लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जाहिर केलेल्या आकेडवारीनुसार गेल्या २४ तासांतील आकडेवारी मागील काही दिवसांतील आकडेवारीच्या तुलनेत दिलासा देणारी असली, तरी समाधानकारक नसल्याचे दिसत आहे. रविवारी देशात दिवसभरात तीन लाख ६६ हजार १६१ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर तीन लाख ५३ हजार ८१८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

चिंतेची बाब अशी की कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूंचे संकट कायम आहे. मागील २४ तासांत देशात तीन हजार ७५४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या दोन लाख ४६ हजार ११६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे देशात सध्या ३७ लाख ४५ हजार २३७ रुग्ण उपचार घेत आहेत.

कोरोनाचा फैलाव देशात वेगाने होत असून, आठवडाभरात पाचव्यांदा दैनंदिन रुग्णसंख्या चार लाखांहून अधिक नोंदवण्यात आली आहे. रविवारी देशात कोरोनाचे ४,०३,७३८ नवीन रुग्ण आढळले, तर ४,०९२ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी दिल्ली, उत्तर प्रदेश सरकारने निर्बंध आणखी आठवडाभरासाठी वाढविण्याचा निर्णय रविवारी घेतला. रुग्णवाढीमुळे तमिळनाडू, कर्नाटकमध्ये आजपासून (१० मे) लॉकडाउन लागू करण्यात येत असून, देशातील जवळपास २६ राज्यांत लॉकडाउनसदृश निर्बंध लागू आहेत.