मुंबईकर जिंकत आहेत कोरोनाविरोधातील लढाई; मागील 45 दिवसांत पहिल्यांदाच कमी रुग्णसंख्या


मुंबई : कोणतेही संकट येऊ त्या संकटावर मात करुन पुढे चालण्यात मुंबईकर नेहमीच अग्रेसर आहेत, हे आपल्याला काही नव्याने सांगायची गरज नाही. त्यातच संपूर्ण जगासह देशावर ओढावलेल्या कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही सर्वाधिक धोका असणारी मुंबई आता नव्याने श्वास घेतना दिसू लागली आहे. कारण मुंबईत रविवारी एकूण 2403 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. ज्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 6,76,475 वर पोहोचला. याबाबतची अधिकृत माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ट्विटर अकाऊंटवरुन देण्यात आली आहे. शहरात शनिवारी 2,678 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती.


मुंबई शहराने 18 मार्चला 2877 नव्या कोरोनाबाधितांचा कमी आकडा पाहिला होता. त्यानंतर सातत्याने रुग्णसंख्येचा आलेख चढताच दिसून आला होता. सलग दुसऱ्या दिवशी 3 हजारहून कमी रुग्ण आढळण्याची ही मुंबईसाठीची दुसरी वेळ. तर, 2500 हून कमी रुग्ण आढळण्याची ही मागील 45 दिवसांतील पहिलीच वेळ आहे.

शहरात रविवारी 3375 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा 6,13,418 वर पोहोचला. तर, 68 जणांचा मागील 24 तासांत मृत्यू झाल्याची माहितीही पालिकेने दिली आहे. मुंबईत आतापर्यंत 13,817 रुग्णांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. मुंबईतील कोरोनाबाधितांचे बरे होण्याचे प्रमाण आता वाढले असून, हा आकडा 91 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या शहरात 47,416 सक्रिय रुग्ण आहेत. तर, रुग्णसंख्या दुपटीचा कालावधी हा थेट 153 दिवसांवर पोहोचला आहे.