आज आसामच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार हेमंत बिस्वा सरमा


गुवाहाटी : आज दुपारी 12 वाजता आसामचे भाजप पक्षाचे विधीमंडळ नेते हेमंत बिस्वा सरमा हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र या ठिकाणी पार पडणार आहे. काल झालेल्या एनडीए विधीमंडळ सदस्यांच्या बैठकीत त्यांची नेतेपदी निवड करण्यात आली होती. रविवारी संध्याकाळी चार वाजता राज्यपाल जगदीश मुखी यांची हेमंत बिस्वा सरमा यांनी भेट घेतली होती आणि सत्ता स्थापनेचा दावा केला होता.

सलग दुसऱ्यांदा आसाममध्ये सत्ता टिकवल्यानंतर भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी कोणाचे नाव पुढे येणार याची जोरदार चर्चा सुरु होती. गुवाहाटी येथे रविवारी एनडीएची बैठक पार पडली होती. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि पक्षाचे महासचिव अरुण सिंह हे या बैठकीसाठी निरीक्षक म्हणून उपस्थित होते. या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले की, नवनिर्वाचित सदस्यांनी हेमंत बिस्वा सरमा यांची सर्व संमतीने नेतेपदी निवड केली आहे. ही बैठक सुरु होण्यापूर्वी सर्वानंद सोनोवाल यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता आणि त्यांनीच हेमंत बिस्वा सरमा यांच्या नावाचा प्रस्ताव समोर ठेवला होता.

शनिवारी दिल्लीमध्ये आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनावल आणि हेमंत बिस्वा सरमा यांना बोलवण्यात आले होते. यावेळी या दोन नेत्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर हेमंत बिस्वा सरमा हेच आसामचे नवे मुख्यमंत्री असतील अशी चर्चा सुरु होती.