सरकारला दोष देण्यापेक्षा लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करा, जेठालालचे चाहत्यांना आवाहन


कोरोना प्रादुर्भावचा जोर देशभरात अद्यापही कायम असून, दररोज लाखों कोरोनाबाधितांची भर पडत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येच्या विस्फोटामुळे देशातील आरोग्य सुविधा मेटाकुटीस आल्याचे दिसत असून, वेळेत उपचार न मिळाल्याने, त्याचबरोबर ऑक्सिजन वा इतर सुविधांअभावी बाधितांना आपले प्राण गमवावे लागत असल्यामुळे अनेकजण सरकारवर निशाणा साधत आहेत.

दरम्यान छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील जेठालाल चंपकलाल गडा हे पात्र साकारणारे दिलीप जोशी यांनी देशातील नागरिकांना सरकारला दोष देण्यापेक्षा लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करा, असे आवाहन केले आहे.

लॉकडाऊनचे नियम, सोशल डिस्टंसिंगचे पालन आणि जेथे जास्त लोक जमा होतील तेथे जाऊ नका असे, आवाहन दिलीप जोशी यांनी लोकांना केले आहे. तसेच सर्वांनी मास्क लावणे गरजेचे आहे, कामा शिवाय घराबाहेर पडून नका, असे देखील त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर दिलीप जोशी म्हणाले, लॉकडाऊन संपल्यानंतर आपण आज जशी काळजी घेत आहोत तशीच घेत रहायला हवी. कामाशिवाय लोकांनी घराबाहेर पडू नये किंवा काही झालेच नाही असे वागू नये.

ते पुढे म्हणाले, या परिस्थितीसाठी केवळ सरकारला दोष देण्याऐवजी लोकांनी जबाबदारीने वागायला हवे आणि सहकार्य केले पाहिजे. आपण सर्व सावध राहिलो नाही, सुचनांचे पालन केले नाही तर ही साथ कधीही संपणार नाही. आपण सर्वांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे आवश्यक आहे, मास्क लावावे आणि लवकरात लवकर लस घ्यायला हवी.

महाराष्ट्राबाहेर सध्या अनेक मालिकांचे चित्रीकरण सुरु आहे. पण ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे. दिलीप जोशी या विषयी बोलताना म्हणाले, काम तर होतच राहिल पण लोकांचे जीवन महत्त्वाचे आहे. इतर शहरांमध्ये जे प्रोडक्शन हाऊसेस चित्रीकरण करत आहेत त्यांनी काळजी घ्यायला हवी. देवावर माझा विश्वास आहे. प्रत्येकजण घरी आहे, सध्या कुटुंबापेक्षा काही महत्वाचे नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.