बाबर आझम ठरला एप्रिल महिन्यातील आयसीसीचा सर्वोत्तम खेळाडू


आयसीसीच्या एप्रिल महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला गौरवण्यात आले आहे. नुकत्याच दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पार पडलेल्या सर्व प्रकारच्या क्रिकेट मालिकेत बाबरने नेत्रदीपक कामगिरी केली. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत त्याने ९४ धावांची खेळी केली. या खेळीमुळे त्याला १३ रेंटिग गुण मिळाले. त्याने या गुणांसह भारताच्या विराट कोहलीला मागे टाकत एकदिवसीय क्रमवारीत पहिले स्थान मिळवले. २६ वर्षीय बाबरने आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात २७४ धावांचा पाठलाग करताना १०३ धावा फटकावत संघाला विजय मिळवून देण्यात योगदान दिले.

बाबरने एप्रिल महिन्यात तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये ७६च्या प्रभावी सरासरीने २२८ धावा केल्या. तर, ७ टी-२० सामन्यांत बाबरने ३०५ धावा केल्या. टी-२० मालिकेत पाकिस्तानने झिम्बाब्वेला २-१ असे पराभूत केले, या संघाआधी एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत पाकिस्तानचा संघ दक्षिण आफ्रिकेला हरवून आला होता.

महिलांमध्ये एप्रिल महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हिलीने महिलांमध्ये आपल्या नावावर केला. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यात हिलीने ५१.६६च्या सरासरीने १५५ धावा केल्या. ती न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत सर्वाधिक धावा करणारी फलंदाज होती. पुरुष आणि महिला अशा दोन्ही प्रवर्गातील तीन उमेदवारांना मैदानातील कामगिरीच्या आधारे निवडले जाते. त्यानंतर या खेळाडूंसाठी स्वतंत्र आयसीसी मतदान अकादमीद्वारे मतदान केले जाते.