या चीनी कंपनीत आहेत सर्वाधिक अब्जाधीश

अमेरिका हा जगातील श्रीमंत आणि मोठी अर्थव्यवस्था असलेला देश म्हणून ओळखला जात असला तरी सर्वाधिक अब्जाधीश असण्यात चीनी कंपनीने अमेरिकन कंपन्यांना मागे टाकले आहे. एकट्या बीजिंग मध्ये १०० हून अधिक अब्जाधीश आहेत. अन्य कंपन्यांच्या तुलनेत कमी चर्चेत असलेल्या बॅटरी निर्मात्या कंपनीत ९ अब्जाधीश आहेत. फेसबुक, वॉलमार्ट, गुगल मध्ये प्रत्येकी आठ अब्जाधीश आहेत.

चीनच्या कंटेंपररी एक्स्पोनंट टेक्नोलॉजी म्हणजे सीएटीएल मध्ये जगात सर्वाधिक अब्जाधीश आहेत. ही कंपनी बीएमडब्ल्यू, फॉक्स वॅगन, मर्सिडीज या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक वाहनासाठी बॅटरीज पुरविते. इलेक्ट्रिक कार्स क्षेत्रात बॅटरी सेक्टरमध्ये या कंपनीचा जागतिक वाटा २२ टक्के असून त्याच्यापुढे पोलंडची एलर्जी एनर्जी सोल्युशनही एकमेव कंपनी आहे. या कंपनीचा वाटा २८ टक्के आहे.

विशेष म्हणजे सीएटीएलची स्थापना २०११ मध्ये झाली असून करोना काळात या कंपनीचा विकास अतिवेगाने झाला आहे. गेल्या वर्षात कंपनीचा शेअर १५० टक्के वाढला असून संस्थापक आणि सीईओ रॉबीन झेंग यांच्याकडे २५ टक्के शेअर्स आहेत. त्यांच्या संपत्तीत मार्च २०२० पासून तिप्पट वाढ झाली आहेत. फोर्ब्स धनकुबेर यादीत ते ४७ व्या नंबरवर आहेत. चीन सरकारने २०१५ मध्ये इलेक्ट्रिक कार बॅटरी सबसिडी सुरु केल्याने उत्पादन खर्च कमी झाला आहे. याच काळात पेट्रोल डिझेल दर वाढ आणि प्रदूषण यामुळे इलेक्ट्रिक कार्सची मागणी व पर्यायाने बॅटरी मागणी वाढली आहे. या कंपनीवर चीन सरकारची मर्जी असल्याचेही बोलले जाते.