सर्दीचा विषाणू रोखू शकतो करोना

युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगोच्या वैज्ञानिकांनी सर्दी पडसे होण्यासाठी जबाबदार असलेला राईनो विषाणू करोनाच्या विषाणूला रोखू शकतो असा निष्कर्ष काढला आहे. या साठी केल्या गेलेल्या संशोधनात माणसाच्या श्वसनतंत्रासारखे एक उपकरण तयार केले गेले आणि कोशिका बनविल्या गेल्या होत्या. यात कोविड १९ आणि राईनो हे दोन्ही विषाणू एकाचवेळी संक्रमित केले गेले. त्यावेळी सर्दी पडसे होण्यासाठी कारणीभूत असलेला राईनो विषाणू अधिक प्रभावशाली असल्याचे दिसले.

राईनो विषाणूने करोना विषाणूचा प्रसार रोखून ठरला होता मात्र राईनो विषाणू थोडा काळ राहत असल्याने हा फायदा थोड्या वेळासाठीच मिळू शकला. पण मानवी शरीरात हा विषाणू ज्या प्रकारे पसरतो त्यामुळे करोनाचा प्रभाव कमी होण्यास नक्कीच मदत मिळते असे दिसून आले. अर्थात राईनो कमी कालावधीसाठीच शरीरात राहत असल्याने त्यानंतर करोना पुन्हा हल्ला करू शकतो असेही या संशोधकांचे म्हणणे आहे.

त्यातून असा निष्कर्ष काढला गेला आहे की, राईनोचा संसर्ग झाल्यावर चोवीस तासानी कोविड विषाणू मानवी शरीरात गेला तर राईनो या विषाणूला बाहेर काढू शकतो. अर्थात यावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे. हा पेपर जर्नल ऑफ इन्फेक्शियस डिसीज मध्ये प्रकाशीत  केला गेला आहे.