आता कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड मध्ये करता येणार निवड

१८ वर्षावरील सर्वाना कोविड १९ लस देण्याची मोहीम सुरु झाली आहे. पण नागरिकांना आता त्यांना कोवॅक्सिन लस घ्यायची की कोविशिल्ड घ्यायची याची निवडही करता येणार आहे. १८ वर्षावरील लसीकरण सुरु झाल्यावर कोवीन पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र या प्रक्रियेत काही गडबडी झाल्यामुळे या पोर्टल मध्ये आवश्यक ते बदल केले गेले आहेत. त्यानुसार आता नवीन नोंदणी केल्यावर अपॉइंटमेंट बुक झाली की मोबाईलवर चार आकडी ओटीपी येत आहे. हा ओटीपी लसीकरण केंद्रावर दाखवावा लागणार आहे. त्यामुळे नोंदणी केलेले तुम्हीच आहात याची खात्री पटविली जाणार आहे.

ओटीपी शिवाय डॅश बोर्ड मध्येही बदल केला गेला असून पोर्टल ओपन केल्यावर सहा पर्याय दिसत आहेत. त्यात कोवॅक्सिन की कोविशिल्ड, मोफत का पेड यातून निवड करता येणार आहे. या पूर्वी लस दिल्यावर आलेल्या मेसेज वरून तुम्हाला कुठली लस दिली गेली ते समजत होते. लस निवडीचा अधिकार असावा अशी मागणी पूर्वीपासून केली जात होती.

कोवीन पोर्टलवर नोंदणी केली पण लस न घेताच लस दिल्याचे मेसेज नागरिकांना मिळत होते. त्यामुळे गडबड झाली होती. ती त्रुटी पोर्टल मध्ये बदल करून काढून टाकली गेल्याचे स्वास्थ आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.