पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या ड्युटीला गेलेल्या शिक्षकासह कुटुंबातील चौघांचा कोरोनामुळे मृत्यू


पंढरपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी पंढरपूरची पोटनिवडणूक अतिशय पोषक ठरली असून यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले. या निवडणूक प्रक्रियेत जे सामील होते, त्यांना याचा सर्वाधिक फटका बसला असून त्यांना झालेल्या प्रादुर्भावामुळे इतरांनाही आपले प्राण गमवावे लागत आहेत. असाच एक धक्कादायक सांगोला तालुक्यात प्रकार समोर आला असून केवळ निवडणुकीच्या ड्युटीला गेलेल्या शिक्षकासह त्याच्या कुटुंबातील आई, वडील आणि मावशीचा मृत्यू झाला.

सांगोला तालुक्यातील घेर्डी येथील प्रमोद माने हे शिक्षक पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी मतदानाच्या ड्युटीला होते. तिथून परतल्यावर त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यामुळे त्यांची पत्नी, मुलगा, आई, वडील आणि मावशी यांनाही कोरोनाची लागण झाली. प्रमोद माने यांच्यावर सुरुवातीला सांगोला येथे उपचार करण्यात आले. पण त्यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांच्या डॉक्टर भावाने त्यांना मुंबई येथे हलवले. पण प्रयत्नांची शिकस्त करुनही प्रमोद माने यांना आपला जीव गमवावा लागला आहे.

यानंतर त्यांचे वडील वसंतराव, आई शशिकला आणि मावशी जया घोरपडे यांचेही कोरोनामुळे निधन झाले. सुदैवाने त्यांची पत्नी आणि मुलाने कोरोनावर मात केली. परंतु या निवडणुकीमुळे केवळ शासकीय ड्युटी करणाऱ्या प्रमोद माने यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे माने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

प्रशासन, राजकीय नेत्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला फारसे गांभीर्याने न घेण्याची मोठी चूक केली आणि त्याच काळात पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीची घोषणा झाली. यावेळी कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून कार्यकर्त्यांच्या आढावा बैठका, मोठ्या नेत्यांचे दौरे नियमितपणे सुरु होते. परिणामी पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीनंतर परिसरात कोरोनाने कहर केला असून रुग्णसंख्या पाचपटीने वाढली आहे. तर गेल्या 20 दिवसांत 125 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.