शासकीय भरती प्रक्रियेत निवड झालेल्या मराठा उमेदवारांना तात्काळ सेवेत सामावून घ्यावे, याबाबत मुख्यमंत्र्यांना संभाजीराजेंचे पत्र


कोल्हापूर – मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे राज्य सरकारसमोर नवा पेच उभा राहिला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर नाराजीचा सूर मराठा समाजामधून उमटत असून, राज्य सरकारकडून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसत आहे. या विषयावर राज्यात चर्चा सुरू असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून एका महत्त्वाच्या विषयाकडे छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी लक्ष वेधले आहे.

मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राज्य सरकारकडून विविध पर्यायांची पडताळणी सुरू आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची तयारी सरकारने दर्शवली आहे. राज्य सरकारकडून हालचाली केल्या जात असतानाच छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी नोकर भरतीचा मुद्दा उपस्थित केला आहे.

छत्रपती संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेले पत्रात महाराष्ट्र विधिमंडळाने पारीत केलेल्या व मुंबई उच्च न्यायालयाने कायम केलेल्या मराठा आरक्षण कायद्यांतर्गत २०१८ सालापासून मराठा समाजातील अनेक उमेदवार विविध शासकीय भरती प्रक्रियांमध्ये नियुक्तीसाठी पात्र ठरले आहेत. महाराष्ट्र शासनाने मागविलेल्या एका अहवालानुसार असे २,१८५ मराठा उमेदवार असून, त्यांना अद्याप नियुक्तीपत्र देणे बाकी आहे. प्रथमतः कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली टाळेबंदी व नंतर मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. ९ सप्टेंबर २०२० रोजी मराठा आरक्षण अंमलबजावणीस दिलेली स्थगिती, या कारणांमुळे शासनाकडून या उमेदवारांस सर्व प्रक्रिया पूर्ण असूनही नियुक्तीपत्र देण्यास विलंब झाला.


सध्या मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. ५ मे २०२१ रोजी मराठा आरक्षण कायदा रद्द करताना हा आदेश पूर्वलक्षी प्रभावाने लागू न करता, दि. ९ सप्टेंबर २०२० पूर्वी निवड प्रक्रिया पूर्ण झालेल्या सर्व मराठा उमेदवारांच्या नियुक्तीस संरक्षण दिले आहे; त्यामुळे शासनाने अतिविलंब न करता या सर्व उमेदवारांना, ते ज्या पदासाठी पात्र ठरले आहेत, त्याच पदाची नियुक्तीपत्रे देऊन त्वरीत शासकीय सेवेत सामावून घ्यावे.

तसेच, दि. ९ सप्टेंबर २०२० पूर्वी व नंतर सुरू झालेल्या व अद्याप पूर्ण न झालेल्या शासकीय भरती प्रक्रियांमध्ये सहभागी झालेल्या मराठा उमेदवारांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दि. ४ जानेवारी २०२१ रोजी काढलेले प्रसिद्धीपत्रक (एमआयएस-०६१८/सीआर-६१/२०१८/तीन) मधील कलम ३ मधील उपकलमांमुळे प्रवर्ग निवडण्याबाबत संभ्रम होता. यामुळे सदर प्रक्रियेत ज्या मराठा विद्यार्थ्यांनी एस.ई.बी.सी. व ओपन प्रवर्ग निवडला आहे, अशा सर्व मराठा विद्यार्थ्यांना ई.डब्लू.एस. प्रवर्ग निवडण्याचा पर्याय तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा. वरील सर्व सूचनांचा सकारात्मक विचार करून, कोणताही निर्णय अधांतरी न ठेवता, कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजास न्याय देण्याची ठोस भूमिका शासनाने ठेवावी, असे म्हटले आहे.